पाऊस कोसळू लागला, की धरणे भरून वाहू लागल्याची छायाचित्रे सर्वत्र झळकू लागतात. मनात दडलेले पाण्याबद्दलचे कुतूहल चेहऱ्यावर आणत लोक ही छायाचित्रे आश्चर्याने पाहतात आणि जमल्यास हा आनंद घेण्यासाठी अशा एखाद्या धरणावरही जातात. पावसाळय़ात प्रत्येक धरणावरचाच हा देखावा. पण भंडारदऱ्यासारख्या धरणावर अधिक जिवंत होतो तो इथला निसर्गसौंदर्य!
महाराष्ट्रात ब्रिटिशांनी जी काही मोजकी धरणे बांधली त्यापैकी एक भंडारदरा! नगर जिल्हय़ाच्या अगदी पश्चिमेला अकोले तालुक्यातील ऐन घाटमाथ्यालगतचा हा भाग. डोंगरदऱ्या, दाट जंगल, ऐतिहासिक गडकोट, आदिवासींच्या छोटय़ा छोटय़ा वाडय़ावस्त्या या साऱ्याच्या पाश्र्वभूमीवर हे धरण इथे साकारले आणि जणू इतके दिवस अपुरे असलेले एक निसर्गचित्रच पूर्ण झाले.
अगस्ती ऋषींची ही तपोभूमी! असे म्हणतात, की या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवण्यासाठी अगस्ती ऋषिमुनींच्या तपश्चर्येतून ही गंगारूपी प्रवरा इथे अवतरली आणि तिच्यामुळे आता हे निसर्गाचे भांडारही फुलले, बहरले- भंडारदरा!
भंडारदऱ्याला पुण्याहून जायचे झाल्यास पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेरहून अकोले, राजूर मार्गे जावे लागते. हे अंतर आहे १९० किलोमीटर. तर मुंबईहून यायचे असल्यास कसारा घाटातून घोटी मार्गे १८५ किलोमीटर. कुठल्याही मार्गे आलो तरी डोगरदऱ्यांमधून असलेल्या प्रवासाने डोळे सतत चहूबाजूंना भिरभिरत राहतात. निसर्गसौंदर्याच्या याच देणगीने भंडारदरा तसे वर्षभर येण्या-जाण्यासारखे. पण त्यातही पावसाळा हा इथला विशेष ऋतू! या काळात इथली सृष्टी थोडी निराळी, पावसात भिजलेली, धुक्यात बुडालेली आणि धुंद वातावरणाने भारलेली! भंडारदऱ्याला जाऊ लागलो, की सृष्टीची ही धुंदी वाटेवरील राजूरपासून जाणवायला लागते. इथेच खळखळत, प्रसंगी पात्र सोडून बाहेर उसळणारी प्रवरा आडवी जाते आणि पुढे घाटमाथ्यावरील पावसाचा अंदाज येतो. हा अंदाज कुठे बांधत असतो तोच तड तड आवाज करत पावसाची एखादी मोठी सर येते आणि ढगांनी गच्च भरलेले समोरचे आकाश रिते करून जाते. भोवतालचे हिरवे डोंगर पुन्हा न्हाऊन नितळ होतात. त्या निथळत्या अंगावरूनच मग असंख्य जलधारा वाहू लागतात. अनेकदा या पाण्याला स्पर्श नाही केला तरी चिंब भिजायला होते. अशा चिंब मनाने भिजलेल्या अवस्थेतच आपण धरणावर येऊन थांबतो.
आपल्याकडच्या अनेक निसर्गस्थळांची माहिती घेऊ लागलो, की तिथे इंग्रजांची पावले उमटलेली दिसतात. या अनेक आडवाटा या गोऱ्या साहेबांनी त्या काळातच फिरून, शोधून काढल्या आहेत. असाच एक गोरा पाहुणा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या भागात आला, त्याचे नाव आर्थर हिल! या भागात प्रचंड पाऊस पडतो. पण सारे पाणी वाहून जाते. हे वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी, इथे एखादी सिंचन योजना बांधावी, यासाठी हा ब्रिटिश अभियंता इथे आला आणि त्याने एक जलाशय बांधले. जे पुढे ‘आर्थर लेक’ नावानेच ओळखू लागले.  पुढे या जलाशयाच्या भोवतालीच धरण बांधण्याची योजना आली. १९१० साली सुरू झालेले हे काम तब्बल सोळा वर्षे चालले. जवळपास २७० फूट उंचीचे हे धरण त्या वेळी भारतातील सर्वात मोठे धरण ठरले. या धरणाचे उद्घाटन मुंबई इलाक्याचे तत्कालीन गव्हर्नर सर लेल्सी विल्सन यांच्या हस्ते झाले आणि या धरणाला त्यांचेच नाव दिले गेले- ‘विल्सन डॅम’! हाच आजचा भंडारदरा जलाशय! अशा प्रकारे या आर्थर लेक, विल्सन डॅम आणि भंडारदरा असा हा प्रवास! या दरम्यान अनेक ब्रिटिशांची पावले या परिसरात उमटली आणि त्या सर्वाची मने या घाटमाथ्याने जिंकून घेतली. मग त्यांच्यासाठी धरणस्थळावर आणि घाटमाथ्याच्या अगदी कडय़ावर घाटघर गावी दोन टुमदार बंगलेही बांधण्यात आले. एकूणच भंडारदऱ्याची ही पर्यटनाची हाक अगदी तेव्हाच सुरू झाली.
अशा या भंडारदऱ्याच्या काठी येऊन बसलो, की समोरचे दृश्य आजही आपल्याला गुंतवून टाकते. ऐन घाटमाथ्यावर असूनही चहूबाजूने डोंगराच्या मधोमध एका बशीसारख्या भागात हे जलाशय साकारले आहे. नजर जाईल तिथवर पाणी आणि अडेल तिथे डोंगर हेच पहिले दृश्य! या पाण्याच्याही विविध छटा. एरवी कधी ते धुक्यात हरवलेले, कधी ते चंदेरी चमचमणारे, कधी आकाशाची निळाई सांगणारे असे हे पाणी ऐन पावसाळय़ात मात्र ढगांशी बिलगत स्वप्नील होते.
भोवतीच्या डोंगरांच्याही याच नाना छटा! खरेतर भंडारदऱ्याभोवतीचे हे सारे डोंगर राकट, अंगावर येणारे. उन्हाळय़ात ते अधिक भयाण, राक्षसी भासतात. पण तेच पाऊस सुरू झाला, की त्यांचे हे राकटपण गळून पडते आणि त्यांच्यात हिरवाईचे तारुण्य संचारते. विविध रंगांची, आकाराची रानफुले त्याला आणखी सजवतात. पावसाच्या मध्यापर्यंत हे हिरवे डोंगर जांभळे-निळे भासू लागतात. सारेच चित्र मोरपंखी, स्वप्नवत होते.भंडारदऱ्याच्या सभोवतालच्या डोंगरांनाही त्यांच्या त्यांच्या ओळखी. भंडारदऱ्याच्या डाव्या बाजूने सुरुवात केली तर रतनगड, अलंग, कुलंग आणि मदनगड असे वर्तुळाकार मार्गात एकेक गडकोट लागतात. या रांगेत अगदी शेवटी मान वर काढत महाराष्ट्राची ती कळसूबाई सर्वोच्च जागी (१६४६ मीटर) स्थिरावली आहे. या साऱ्या डोंगराखालून धरणाला वेढा घालत रतनवाडी, घाटघर मार्गे एक रस्ता धावतो. जंगल-डोंगरातील या प्रवासाचा अनुभव एकदा तरी नक्की घ्यावा असा आहे.या धरणाच्या भिंतीलगतच आता एमटीडीसी आणि अन्य संस्थांची विश्रामगृहे थाटली आहेत. याशिवाय पर्यटकांसाठी इथे नौकाविहाराचीही सोय केली आहे. पावसाळय़ात धरणातून पाणी सोडले, की हे पाणी बाहेर एका मोठय़ा गोलाकार खडकावरून खाली येते. या वेळी या फेसाळत्या पाण्याला एका छत्रीसारख्या धबधब्याचे रूप येते. धबधब्याच्या या छत्रीला ‘अम्ब्रेला फॉल’ असे नाव मिळाले. या धबधब्यासमोरच एक छोटेसे उद्यान थाटले आहे. या उद्यानात यावे आणि भोवतालच्या झाडांच्या कमानीतून ही फेसाळती छत्री तासन्तास पाहात राहावी!
खरेतर पावसाळा सुरू झाला, की या घाटमाथ्यावर सर्वत्रच जागोजागी धबधबे जन्म घेतात, पण या साऱ्या धबधब्यांमध्ये आकार, रूपाने सर्वात उजवा, तो रंधा! भंडारदरा धरणातून पुढे वाहणाऱ्या प्रवरा नदीवर हा प्रपात कोसळतो, त्याच्या ‘प्रपात’ या शब्दाला शंभर टक्के जागवत! भंडारदरा येण्यापूर्वी दहा किलोमीटरवर असणाऱ्या रंधा गावाजवळ ही प्रवरा नदी घाटमाथ्यावरून खाली दरीत उडी घेते आणि त्यातूनच हा प्रपात जन्माला येतो. रंधा गाव जवळ येताच त्याचा रोरावणारा आवाज कानी येऊ लागतो. पावले या आवाजाच्या दिशेने निघतात. आवाजाचे हे गूढ, प्रत्यक्ष धबधबा दिसेपर्यंत आणखी वाढते आणि दिसल्यावर केवळ स्तब्ध व्हायला होते.
..एक झोकदार वळण घेत निघालेली प्रवरा इथे ५० ते ६० मीटर खोल उडी घेते. ज्या वेगाने हे पाणी खाली आदळते त्याच वेगाने ते पुन्हा वर उसळी घेते. या मंथनामधून इथे पाणी, त्याचे उंच उडणारे तुषार आणि धुकट धुके असे एक वेगळेच स्वर्गीय दृश्य तयार होते. या मुख्य धबधब्याच्या कडेनेही अनेक छोटय़ामोठय़ा जलधारा जटा पसरल्याप्रमाणे वाहात असतात. हा धबधबा पाहात असताना पावसाची एखादी मोठी सर येते आणि या साऱ्या दृश्याला आपल्या कवेत घेऊन अदृश्य करते. काही कळायच्या आत समोर फक्त धुक्याचा धूसर पडदा उरतो. दिसत काही नाही, पण कानी तो घुमणारा आवाज येत राहतो. काही क्षणात धुके हटते, पाऊसही मागे पडतो. काही क्षणापुरती सोनेरी प्रकाशाची किरणे सर्वत्र पसरतात आणि मग या किरणांवर स्वार होत इंद्रधनुष्याचे रंगही फेर धरू लागतात!

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
soil dumping in Pavana
पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा, महापालिकेकडून दंडात्मक कारवाई