पाचवीत शिकणा-या चेन्नईतील एका मुलाने शाळेच्या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाची रक्कम गंगा स्वच्छ करण्याच्या अभियानासाठी दान केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयातून त्याचे कौतुक करणारे पत्रही त्याला पाठवण्यात आले आहेत. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मोदींनी ‘नमामी गंगे’ हे अभियान राबवले आहे. या अभियानाअंतर्गत गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पाउल उचलले आहे. गंगा प्रदूषणमुक्त बनवण्याच्या अभियानात खारीचा वाटा उचलत चैन्नईतल्या पाचवीत शिकणा-या डिएवी शाळेच्या शशांक याने एक हजार रुपये पंतप्रधान कार्यालयाला पाठवून दिले आहे.

शशांक शाळेतल्या पाच संस्कृत स्पर्धेत अव्वल आला आणि त्यासाठी त्याला १ हजार रुपयांचे बक्षिसही देण्यात आले. पण हे पैसे खर्च न करता शशांकने ते गंगच्या स्वच्छतेसाठी वापरण्याचे ठरवले. यासाठी त्याने मोदींना पत्र लिहून आपला मानस बोलून दाखवला आहे. तसेच गंगा ही आपली पवित्र नदी असून ती स्वच्छ राखली पाहिजे असेही त्याने पत्रात लिहले आहे. इतकेच नाही तर मोदींना त्यांनी आपल्या घरी येण्याचे निमंत्रणही दिले आहे. त्याच्या या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयातून घेतली गेली आहे. नमामी गंगेच्या अभियानाला मदत केल्याबद्दल नरेंद्र मोदींनीही त्याचे आभार मानल्याचे पत्र त्याला पंतप्रधान कार्यालयाकडून पाठवण्यात आले आहे.