केक म्हटला की तो फार फार तर आठवडाभर चांगला राहू शकतो. नंतर तो खराब होतो. पण तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की काही संशोधकांना अंटार्क्टिकामध्ये एक पेटी सापडली आहे आणि ज्यात १०० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला फ्रूटकेक अगदी चांगल्या स्थितीत होता. अंटार्क्टिका हेरिटेज ट्रस्टच्या संशोधकांना ही पेटी सापडली.

या पेटीचा वरचा भाग जरी खराब झाला असला तरी यामध्ये असलेला केक मात्र अत्यंत चांगल्या स्थितीत होता. कागदात गुंडाळलेल्या या केकचा कागदही खराब झाला नव्हता. एका ब्रिटिश गिर्यारोहकाची ही पेटी आहे. साधरण १९१० ते १९१३ च्या दरम्यानचा हा केक असावा असा अंदाज संशोधकांनी काढला आहे. हा केक इतक्या वर्षांनंतरही खराब न होता टिकून होता. एवढंच नाही तर कोणीही तो खाऊ शकतो अशा स्थितीत होता.

अंटार्क्टिकामध्ये तापमान हे उणे अंश सेल्शिअस असतं, तेव्हा कदाचित बर्फामुळे आणि तापमानामुळे हा केक चांगल्या स्थितीत राहिला असेल असा संशोधकांनी अंदाज बांधला आहे. पण इतके वर्षे हा केक कसा काय चांगल्या स्थितीत आहे यावर संशोधक अधिक अभ्यास करत आहे.