माणसानं साठी ओलांडली की त्याला निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे वेध लागतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेले पैसे कुठेतरी गुंतवायचे आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या पैशांतून उर्वरित आयुष्य जगायचे हाच तो त्यांच्यासाठी सुखाचा परमोच्च बिंदू. त्यातही ७०-८० वर्षे वय झालं की ‘नांदतं गोकुळ’ पाहात दिवस काढायचे असंच काही तरी म्हणतात ना? पण १०१ वर्षांच्या मन कौर यांनी हा समज खोटा ठरवला आहे. जमिनीपासून शंभराहून जास्त फुटांवर ‘स्कायवॉक’ केलाय.

भारताच्या १०१ वर्षीय अॅथलीट मन कौर ‘स्कायवॉक’ करणाऱ्या सर्वात वयस्कर अॅथलीट ठरल्या आहेत. त्यांनी न्यूझीलंडच्या ऑकलंडच्या स्काय टॉवरमध्ये हा स्कायवॉक करत त्यांनी हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. त्यांनी गुरूवारी ‘वर्ल्ड मास्टर गेम्समध्ये’ ही कामगिरी केली आहे. १९२ फुटांवर हा स्कायवॉक केला आहे. त्यांनी त्यांच्या ७९ वर्षांचा मुलगा गुरदेव सिंग याच्या मदतीने ही कामगिरी केली. ही कामगिरी केल्यानंतर त्यांनी भारताचा झेंडा अभिमानानं फडकावला. त्यांनी त्यांच्या मुलाच्या मदतीने ही कामगिरी केली असली तरी जमिनीपासून १९२ फूट उंचावर आपण गेलो तर आपले डोळेच फिरतील. अशा वेळी वयाच्या १०१ व्या वर्षी मुलाच्या मदतीनं का होईना त्यांनी ही कमाल करून दाखवली आहे. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी चक्क धावण्याच्या स्पर्धेतही भाग घेतला. १०० मीटर स्पर्धेत तर धावल्याच; पण २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला. त्यांची चिकाटी आणि फिटनेसची कथा इथेच संपत नाही. तर त्यांनी भालाफेक आणि गोळाफेक स्पर्धेतही भाग घेतला.

आता बोला! जिमला जाणं टाळण्यासाठी तुमचं आजचं एक्सक्यूज काय होतं?