आतापर्यंत टीव्ही किंवा युट्यूबवर दिसणाऱ्या शेफचे कुकिंग शो तुम्ही पाहिले असतीलच. छान किचन, आजूबाजूला आधुनिक उपकरणं आणि देशी विदेशी भाज्या, फळे मसाले वापरून हटके पदार्थ प्रेक्षकांना ते बनवून दाखवत असतात. पण कुकिंग शोजचा हा साचेबद्ध ठोकळा मोडून काढलाय तो १०६ वर्षांच्या आजींनी. आपण बाबा मातीत खेळणारी आणि याच मातीत राबणारी माणसं तेव्हा कशाला हवेत किचन वगैरेचे मोठेपण त्यापेक्षा चुलीवरच जेवण बनवू असा आजींचा साधा फंडा.

मग काय, ती आणि तिच्या नातवाने मिळून सुरु केलं एक युट्यूब चॅनेल. ‘कंट्री फूड’ नावाने हे चॅनेल युट्यूबवर प्रसिद्ध आहे. या चॅनेलवर शेफ आहेत त्या १०६ वर्षांच्या मस्तन्नमा आजीबाई. आजींना हल्लीच्या मुलांना आवडणारा पास्ता, बर्गर, पिझ्झा असलं काही येत नाही किंवा असे पदार्थ बनवण्याच्या भानगडीतही त्यांना पडायचे नाही. यापेक्षा अस्सल गावरान आणि पारंपरिक पदार्थ बनवण्याकडे आजींचा कल असतो. एखाद्या कुकिंग शोमध्ये असतो तसा मोठा सेटअप नाही, किचन नाही की शेगडी नाही. आजी शेतातला एखादा कोपरा निवडतात आणि तिथेच चुलीवर जेवण बनवयला सुरूवात करतात. आता शंभरी ओलांडलेल्या त्यांच्या वयाच्या व्यक्ती अंथरूणात खिळलेल्या असतात पण आजी अगदी ठणठणीत. त्यांचा उत्साह एखाद्या तरूण शेफला लाजवेल इतका आहे. त्यामुळे या शेफ आजीबाई सगळ्यांना खूप आवडल्या आहेत.

सध्या जमाना सोशल मीडियाचा आहे. इथे प्रत्येकाला आपली कला दाखवण्याची संधी मिळते आणि व्यासपीठ देखील. आता इतकी चांगली संधी मिळतेय तर मागे कशाला राहा! याच विचाराने त्यांनी युट्यूब चॅनेल सुरू केला होता. बघता बघता आजींच्या पाककृती एवढ्या प्रसिद्ध झाल्या की त्यांच्या काही व्हिडिओंना साडेतीन लाखांहूनही अधिक व्ह्यूज आहेत.