लहान मुलं खूप निरागस असतात. या लहान मुलांबाबात गांधीजींनी एक गोष्ट सांगितली होती. व्यक्ती ओळखीची असो किंवा नसो, ती लहान असो की मोठी मुलं नेहमीच त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करतात. मत्सर, राग, क्रोध या भावना त्यांच्या मनात कधीच नसतात. ते १०० टक्के खरेही आहे म्हणा. लहान मुलांचे मन खरच निरागस असतं. त्यांच्यासाठी सगळेच सारखे असतात, कोणताही भेदभाव त्यांच्या मनात नसतो. त्यांची मैत्रीही तितकीच निखळ असते, मैत्रीला स्वार्थाच्या तराजूत तोलायचे नसते हे समजण्याइतके त्यांचे बालमन सुज्ञ असते. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते. हे कोणीही नाकारु शकत नाही. आता हेच बघ ना राजस्थानमधल्या दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी आपल्या अपंग मैत्रिणीसाठी आपल्या पॉकेट मनीमधून एक व्हिलचेअर विकत घेतली.

वाचा : मृत्यूपूर्वी जुळ्या भावाचे बहिणीसोबत शेवटचे क्षण कॅमेरात कैद

राजस्थानमधल्या गंगाधर जिल्ह्यात राहणारी ख्याती आणि तिचे वर्गमित्र यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शाळेतील एका कार्यक्रमात दहा वर्षांची उषा आली होती. उषा येथील सरकारी शाळेत शिकते. उषा या इतर लहान मुलांसारखी नक्कीच नव्हती. हे जेव्हा दुसरीत शिकणा-या ख्यातीच्या लक्षात आले तेव्हा मात्र तिच्या बालमनाला खूपच दु:ख झाले. उषा आपल्यासारखी का नाही असा प्रश्न ख्यातीलाही पडला. आपण धावू शकतो, खेळू शकतो पण उषा मात्र आपल्यासारखी नाही याचे राहून राहून तिला वाईट वाटत होते. त्यातून उषा एका गरिब कुटुंबात जन्मली होती. ख्यातीने ही गोष्ट आपल्या आजोबांना सांगितली अन् आजोबांनी ख्यातीला एक चांगली कल्पना दिली. ख्यातीने आजोबांची हिच कल्पना आपल्या वर्गमित्रांना सांगितली. मग काय सगळ्यांनी तयारी दर्शवली. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ख्याती आणि तिच्या वर्गमैत्रिणींनी उषासाठी आपल्या पैशातून व्हिलचेअर खरेदी केली.

वाचा : चिमुकलीला नाश्ताही करायला वेळ नाही..!

ख्याती आणि दुसरीत शिकणा-या तिच्या इतर वर्गमित्रांनी आपापल्या परिने उषाला मदत केली, कोणी शंभर रुपये तर कोणी हजार रुपये दिले आणि या पैशांतून त्यांनी उषाला एक व्हिलचेअर भेट म्हणून दिली. खरं तर उषा त्यांच्या शाळेत शिकत नाही, पण तरीही तिला मदत करण्याची भावाना या चिमुकल्यांच्या मनात आली अन् मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी तिला मदत केली. याचे कौतुक करावे तेवढे कमीच.