भारतात दिवसेंदिवस विविध क्षेत्रांचा विस्तार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात काही क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अक्षय उर्जेच्या क्षेत्रात येत्या काळात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे नुकतेच एका अहवालातून समोर आले आहे. काऊंसिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट आणि वॉटर आणि नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स काऊंसिल या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. यासाठी या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचेही अहवालात नमूद कऱण्यात आले आहे.

येत्या पाच वर्षांत या क्षेत्रात ३ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अभ्यासानुसार पवनऊर्जेच्या क्षेत्रात ३४ हजार ६०० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. सौर ऊर्जेच्या प्रकल्पात ५८ हजार ६०० नोकऱ्या निर्माण होणार असून छतांवर करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात ३८ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. विशेष बाब म्हणजे जमिनीवरील सौरऊर्जेच्या प्रकल्पांपेक्षा छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत जास्त नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

या अभ्यासानुसार छतावर १ मेगावॉट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारायचा असला तर त्याठिकाणी २५ जणांना नोकऱ्या मिळतात. तर जमिनीवरील सौर ऊर्जेच्या प्रकल्पातंर्गत एका मेगावॉटसाठी केवळ ३ लोकांना नोकऱ्या मिळतात. सरकारचे २०२२ पर्यंत छतावरील सौरऊर्जेचे ४० गीगावॉटचे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ दोन गीगावॉटहूनही कमी प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले आहेत.