सध्या आपल्या रोजच्या जीवनात गॅजेट्सचा वापर प्रचंड वाढला आहे. स्मार्टफोन, टॅबलेट अशी डिव्हाईस नसतील तर आपला रोजचा दिवस सुरूच होत नाही.

लहान मुलांमध्ये या स्मार्टफोन्सची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे. तासन् तास हे सगळेजण स्मार्टफोन्सवर गेम खेळत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशा गोष्टी दूर ठेवण्याकडे सध्या पालकांचा कल आहे.

पण इंग्लंडमध्ये एका चार वर्षांच्या मुलाने आयफोनचा वापर करत त्याच्या आईचा जीव वाचवल्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ४ वर्षांच्या रोमानची आई त्याच्यासोबत असताना अचानक बेशुध्द होऊन पडली. त्यावेळी घरामध्ये रोमान आणि त्याचा लहान भाऊ सोडला तर घरात कुणीही नव्हतं.

परिस्थिती कठीण होती. ही दोन्ही मुलं खूपच लहान होती. त्यांच्याकडून फार मोठी मदत होण्याची अपेक्षा नसताना छोट्या रोमानने प्रसंगावधान राखत त्याच्या आईचा आयफोन आणला. पण हा ‘फिंगरप्रिंट स्कॅन’ने अनलाॅक होणारा फोन होता. तेव्हा रोमानने त्याच्या बेशुध्द पडलेल्या आईचं बोट त्या फोनच्या स्कॅनरवर ठेवत तो फोन अनलाॅक केला.

यानंतरही प्रश्न होता तो मदतीसाठी कोणाला फोन करायचा याचा. आयफोनवरून कोणालाही फोन कसा लावायचा याची माहिती रोमानला नव्हती. पण त्याला आयफोनची ‘सिरी’ सर्व्हिस कशी वापरायची ते माहीत होतं.

अॅपलच्या सगळ्या स्मार्ट उपकरणांमध्ये ‘सिरी’ ही व्हाॅईस असिस्टंट सिस्टिम असते. आपण ‘सिरी’ला आपल्या आवाजात कमांड देत अनेक गोष्टी करू शकतो.

रोमानने याच सिस्टिमचा आधार घेत ‘सिरी’ला इमर्जन्सी नंबरला फोन लावायला सांगितलं. हा फोन लागून लगेचच अँब्युलन्स आणि डाॅक्टर्स रोमानच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी वेळीच उपचार केल्याने रोमानच्या आईचा जीव वाचला.

या घटनेत छोट्या रोमानने दाखवलेलं प्रसंगावधान महत्त्वाचं आहेच. पण त्याचसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत कसं वागायचं याची माहिती घरातलल्या लहान मुलांना देणं अतिशय गरजेचं आहे. आयफोन अनलाॅक करून आपल्या घराचा पत्ता नीटपणे सांगू शकल्यानेच रोमानच्या आईचा जीव वाचू शकला. त्यामुळे आपल्या घराचा पत्ता, फोन नंबर तसंच इमर्जन्सी यंत्रणांशी कसा संपर्क साधायचा अशासारख्या बेसिक गोष्टी लहान मुलांना समजावणं अतिशय महत्त्वाचं आहे.