हवामानातील बदलांमुळे रविवारी विमान प्रवाशांना अतिशय कठिण प्रसंगाचा सामना करावा लागला. तब्बल दीड तास चालू असलेल्या या परिस्थितीत आपला जीव वाचविण्यासाठी प्रवासी देवाचा धावा करत होते. अक्षरशः मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या या प्रवाशांची अखेर सुटका झाली आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट कोस्टमध्ये रविवारी अचानक हवामानात झालेल्या बदलांमुळे एक विमान तब्बल दीड तास हवेत थरथरत होते. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने प्रवाशांच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागले होते. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एअर एशिया एक्स या विमानाने पर्थवरुन उड्डाण केले. त्यानंतर विमान हवेत झेपावले आणि क्वालालंपूरमध्ये आल्यावर विमानाला अचानक झटके लागण्यास सुरुवात झाली. पुढील सलग दीड तास झटके कायम होते. यामुळे लोकांची झोपमोड झाली. निकोलस या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या डाव्या विंगमध्ये स्फोट झाला होता. तर डेव पैरी म्हणाला, हे झटके बसत होते तेव्हा विमानात एक वेगळ्या प्रकारचा वास येत होता.

हे झटके इतके जोरात होते की आपण वॉशिंग मशिनवर बसलो आहोत असे वाटत होते, असे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमधील एका प्रवाशाने सांगितले. इंडिन आणि विंगच्या मधल्या भागात काहीतरी गडबड झाली होती, असे ब्रेंटन एटकिंसन यांनी सांगितले. विमानाच्या कॅप्टनने सांगितल्यानुसार एका ब्लेडमुळे एक इंजिन बंद पडले होते. मात्र झटक्यांचे कारण समजू शकले नाही. ही तांत्रिक गडबड लक्षात आल्यानंतर विमानाला पुन्हा पर्थच्या विमानतळावर यशस्वीपणे उतरविण्यात आले, असे विमानतळावरील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.