23 March 2017

News Flash

ही मुघल राजकन्या आता झोपडपट्टीत राहते!

कोलकात्यात राहणाऱ्या सुलताना बेगमची कहाणी

लोकसत्ता टीम | March 21, 2017 5:19 PM

मुघला राजकन्या राहतेय अत्यंत गरिबीत!

मुघलांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सहिष्णु अकबरापासून ते मराठ्यांचा कट्टर वैरी औरंगजेबापर्यंत मुघल परंपरेत अनेक व्यक्तिमत्त्वं आपल्याला  भेटत जातात. काहीही असलं तरी एका गोष्टीच्या बाबतीत सगळ्यांचं एकमत होतं ते म्हणजे मुघल साम्राज्य जगातल्या अतिशय प्रबळ साम्राज्यांपैकी एक होतं. या सगळ्या चक्रवर्ती सम्राटांच्या पायाशी प्रचंड सत्ता आणि वैभव लोळण घेत होतं. या अशा प्रबळ साम्राज्याची वंशज असणारी एक मुघल राजकन्या गरिबीत दिवस काढत असेल ही कल्पना करवत नाही.

भेटा सुलताना बेगम ना, ही एक मुघल राजकन्या आहे. पण सध्या ती तिचं आयुष्य कोलकातामधल्या एका झोपडपट्टीत काढते आहे. तिच्याजवळ जगण्यासाठीही पैसे नाहीत. शेवटचा मुघल बादशहा बहादुर शाह जफरची सुलताना बेगम ही नातसून आहे.

१८५७ च्या उठावादरम्यान भारतीय सत्तांनी बहादूरशाह जफर याला त्यांचा बादशाह मानत त्याच्या नेतृत्वाखाली आपण इंग्रजांविरोधात उठाव करत आहोत असं जाहीर केलं होतं. उठाव फसल्यानंतर बादशाह बहादूरशाह जफर यांना अटक करत ब्रिटिशांनी त्यांची रवानगी रंगूनच्या तुरूंगात केली. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मुघल सत्ताधीशांच्या उरल्यासुरल्या वंशजांना अटक करत त्यांना ठार करायला सुरूवात केली. त्यामुळे या वंशजांनी भारतातून पलायन करत अनेक देशांमध्ये आश्रय घेतला. पण सुलतानाच्या पतीचे पणजोबा या अटकसत्रातून बचावले.

आज सुलताना बेगम खाण्यापिण्यापुरते पैसे कमवायला लोकांच्या घरची धुणीभांडी करतात. पैसे कमवायला भीक मागणं त्यांच्या स्वभावात नाही आणि ते त्यांच्या ‘शान के खिलाफ’ आहे.

Video : गाडीच्या बोनेटवरच पोलिसांनी तयार केलं ऑमलेट

आपण मोठ्या घराण्यातले असून जगण्यासाठी आपण कधीही भीक मागत नाही असं त्यांचे पती मोहम्मद बेदार बख्त यांनी त्यांना सांगितल्याचं त्या सांगतात. त्यांच्या पतीचे निधन झालं आहे.

गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणारे आपल्या देशात पैशाला ढीगभर आहेत. पण प्रत्यक्ष काही करण्याची वेळ आली कोणीही पुढे येत नाही. मग ते महाराजांच्या गडकिल्ल्यांचं जतन असेल नाहीतर सुलताना बेगमसारख्या विपन्नावस्थेत जगणाऱ्या मुघल राजकन्या असतील. सरकारचं या सर्वांकडे होणारं दुर्लक्ष नेहमीचंच आहे. २००३ साली सरकारने त्यांना ५० हजारांची मदत केली होती. पण त्यानंतर सुलताना धुणीभांडी करतच आपलं आयुष्य कंठत आहेत.

मुघल साम्राज्याची ही राजकन्या आज दिल्लीच्या आलिशान जफर महालात राहू शकली असती पण तिला  लोकांची भांडी घासत आयुष्य काढावं लागतंय. सरकारचं याकडे लक्ष आहे का?

First Published on February 17, 2017 2:26 pm

Web Title: a mughal princess who now lives in a slum