गीर अभयारण्यात आशियायी सिंहांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या वेळी हे सिंह आजूबाजूच्या गावात अगदी मुक्तपणे संचार करतात. शिकारीचा फडशा पाडतात. या सिंहाचा वावर गावक-यांना काही नवा नाही. रात्रीच्या वेळी गावात किंवा गावाच्या वेशीबाहेर त्यांचेच राज्य चालते याची गावक-यांनाही कल्पना आहे. त्यांची जणू सवयच गावक-यांना झाली आहे. पण, हे गावकरी तेव्हा अवाक् झाले जेव्हा जंगलाची राणी रात्री नाही तर दिवसाढवळ्या गावात शिरली. इतकेच नाही तर तिने गावक-यांच्या डोळ्या देखत एका गायीची शिकार देखील केली. गावातील चौकात बसून तिने गायीचा फडशा पाडला अन् सारा गाव मात्र आपापल्या घराच्या गच्चीवर बसून बघत बसला.

VIRAL: पुणेकरांची ‘डोकॅलिटी’, रुमालावर छापली लग्नाची निमंत्रणपत्रिका

गीर अभयारण्यापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वीर गढीया गावात रात्रीच्या वेळी कधीतरी सिंहाचा वावर असतो. हे काही गावक-यांसाठी नवे नाही. पण रविवारी दुपारी मात्र गावक-यांना मोठा धक्का बसला. रविवारी दुपारी जंगलातील एक सिंहिण चक्क गावात शिरली. इतकेच नाही तर या सिंहिणीने एका गायीची शिकार केली. बघता बघता ही बातमी गावभर पसरली अन् सारा गाव आपापल्या घराच्या छतावर बघून हे सारे दृश्य अवाक् होऊन पाहत होता. पण, ही जंगलाची राणी मात्र भर चौकात बसून आपल्या सावजावर ताव मारून आरामात बसली होती. थोड्याच वेळात गावक-यांची इतकी गर्दी जमली की या सिंहिणीने आपले अर्धवट खाल्लेले सावज तिथेच टाकून जंगलात पळ काढला.

आता ही सिंहिण काही परत येत नाही असे वाटून गावक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण थोड्यावेळाने आपली तिच दहशत घेऊन ही सिंहिण परत गावात आली आणि तिथे बसून आपल्या उरलेल्या शिकारीवर ताव मारला. सारे गावकरी या प्रकाराने चक्रावून गेले. अखेर गावक-यांनी गीरच्या वनविभागाला फोन केला. वनविभागाच्या अधिका-यांनी तिला पकडले असून लवकरच तिला अभयारण्यात पुन्हा सोडणार आहेत. पकडलेल्या सिंहिणीने आतापर्यंत माणसांवर हल्ला केला नाही असे वनविभागाने सांगितले. केवळ शिकारीसाठी ती गावत शिरली असल्याचे अधिका-यांनी सांगितले.