२५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ जवान शहिद झाले. तेव्हा शहिदांना श्रद्धांजली देत या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. याचवेळी त्यांनी नववीत शिकत असलेल्या एका मुलाचा देखील उल्लेख केला. हा मुलगा देशाची सेवा करण्याकरता तीन तास जास्त अभ्यास करतो असे त्यांनी म्हटले होते. यावरुनच ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे. मोदींनी उल्लेख केलेल्या या मुलाचा पत्ता शोधण्याचा तगादा नेटीझन्सने लावला आहे.
२५ सप्टेंबरला ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी हर्षवर्धन नावाच्या मुलाचा उल्लेख केला होता. त्यामुळे हा मुलगा नक्की कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ट्विटवर त्यांच्या नावाने विनोद सुरु आहेत. उरी हल्ल्यावर या मुलाने आपल्याला पत्र लिहल्याचे मोदी म्हणाले होते. उरी हल्ल्यामुळे तो खुपच अस्वस्थ झाला आहे, त्यामुळे देशसेवा करण्यासाठी आपल्याला काय करता येईल अशी विचारणा त्याने पत्रातून मोदींकडे केली होती. त्यामुळे आपण चांगला आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी रोज ३ तास जास्त अभ्यास करणार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते. मोदींनी या मुलाचे कौतुक केले होते. त्यानंतर खुद्द मोदींनी कौतुक केलेला हर्षवर्धन कोण हे शोधण्याचा आणि त्यावर विनोद करण्याचा सपाटाच नेटीझन्सने ट्विटरवर लावला आहे.