वूल्फरम आणि अनिशा गोशाल्क या वृद्ध कॅनेडियन दाम्पत्याची काही दिवसांपूर्वीच ताटातूट झाली. उपचार केंद्रात जागा अपुरी पडत असल्यामुळे व्यवस्थापनाकडून या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले गेले. वूल्फरम आणि अनिशा एकमेकांपासून दूर होत असतानाचे छायाचित्र ऑगस्टमध्ये व्हायरल झाले. यावेळी काढण्यात आलेले त्यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. एकमेकांपासून दूर होत असताना काढण्यात आलेल्या ‘त्या’ छायाचित्रामुळे आता वूल्फरम आणि अनिशा पुन्हा एकमेकांच्या जवळ आले आहेत. सरेमधील ब्रिटिश कोलंबिया उपचार केंद्रात आता वूल्फरम आणि अनिशा यांच्यावर उपचार सुरू झालेत.

“मंगळवारी आमच्या कुटुंबीयांनी वूल्फरम आणि अनिशा यांना पुन्हा एकत्र येताना पाहिले. अखेर वूल्फरम यांना अनिशा यांच्या जवळ हलवण्यात आले आहे”, अशी माहिती त्यांची नात अॅश्ले बार्टिकने फेसबुकवरुन दिली आहे. वूल्फरम आणि अनिशा यांनी त्यांचे पुनर्मिलन साजरे केले. यावेळी या दोघांच्याही डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आणि ओठांवर हसू होते.

“वूल्फरम आणि अनिशा यांचे पुनर्मिलन पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. आता यापुढे ते एकाच छताखाली असतील. यापेक्षा जास्त चांगले काही असूच शकत नाही”, अशा शब्दांमध्ये बार्टिकने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कॅनेडियन आरोग्य केंद्राकडून झालेल्या विलंबामुळे हा प्रकार झाल्याचे बार्टिकने म्हटले आहे.

वूल्फरम आणि अनिशा यांची ताटातूट होत असतानाचे छायाचित्र तीन हजारवेळा शेअर झाले होते. याबद्दल बार्टिकने छायाचित्र शेअर करणाऱ्या आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. वूल्फरम आणि अनिशा यांची ताटातूट होत असतानाचे छायाचित्र करणाऱ्या लोकांमुळेच पुनर्मिलन शक्य झाल्याचे बार्टिकने म्हटले आहे.