एक दिवस सकाळी अचानकपणे तुम्हाला एखाद्या कंपनीकडून फोन येतो. फोनवरील व्यक्ती सांगत असतो की तुम्ही कार लोन किंवा होम लोन घेतले आहे. अशावेळी तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. कदाचित चिडून तुम्ही हा फोन कटही कराल. पण सावधान हा फोन कॉल तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकतो. अशाचप्रकारची एक घटना अहमदाबादमध्ये नुकतीच घडली आहे. एका खासगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या राजेश पांचाल या ३३ वर्षीय व्यक्तीला अशाचप्रकारचा फोन आला. तेव्हा आपल्या नावाने सात बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्याचे त्यांना समजले. तेव्हा राजेश यांना धक्काच बसला. या कर्जासाठी आपण गॅरंटी म्हणून कोणाचे नाव दिले आहे असे त्यांना विचारण्यात आल्यावर तर ते आणखीनच हैराण झाले. त्यांनी थेट बँकेत धाव घेतली.

खरी धक्कादायक बाब तर यापुढे आहे. राजेश यांची आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे बँकेत आधीच जमा झालेली होती. विशेष म्हणजे राजेश यांच्या मागील दोन वर्षांच्या आयकराची फाईलही जमा करण्यात आली होती. आता हे सगळे कसे झाले या विचाराने राजेश पूर्णपणे खचले होते. या कागदपत्रांवर राजेश यांचे पूर्ण नाव होते मात्र छायाचित्र आणि स्वाक्षरी त्यांची नसल्याचे समजले. कौशिक शुक्ला नावाच्या व्यक्तीने राजेश यांची कागदपत्रे वापरुन कर्जासाठी अर्ज केला होता. आता आपली कागदपत्रे आपल्या माहितीशिवाय दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचलीच कशी असा प्रश्न राजेश यांना पडला. त्यावेळी त्यांचा ईमेल आयडी हॅक करण्यात आला असून त्या माध्यमातून त्यांची सगळी कागदपत्रे चोरण्यात आल्याचे लक्षात आले.
राजेश यांनी नवरंगपुरा येथे एफआयआर दाखल केली असून पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशीमध्ये या युवकांनी केवळ कर्जासाठीच या कागदपत्रांचा वापर केला नाही. तर त्याशिवायही या युवकांनी घराचे व्यवहार आणि बँक अकाऊंट उघडण्यासाठी कागदपत्रे वापरल्याचे समोर आले आहे.