रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलने चांगलीच कंबर कसली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने बंपर ऑफर आणली आहे. एअरटेलच्या नव्या प्लाननुसार ग्राहकांना एक हजार जीबी डेटा देण्यात येणार आहे. हा प्लान ब्रॉडबँड युजर्ससाठी आहे. एअरटेलच्या नव्या ऑफरनुसार ग्राहकांसाठी एकून चार प्लान असणार आहे. ज्याअंतर्गत एका वर्षासाठी एक हजार जीबी डेटा मोफत मिळणार आहे. १०९९ रुपये, १२९९ रुपये, १४९९ आणि १७९९ या किंमतीचे हे वेगवेगळे प्लान आहेत. आता या ऑफरमध्ये सगळ्यात स्वस्त प्लानची सुरूवात आहे ती ८९९ पासून. याअंतर्गत ग्राहकांना वर्षाला ७५० जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

 

Airtel broadband plans
Airtel broadband plans

त्याचप्रमाणे हायस्पीड इंटरनेटसाठी एअरटेलने ‘V-Fiber’ ब्रॉडब्रँड आणले होते. त्यामुळे १०० एमबीपीएस स्पीडने डाऊनलोडिंग करणे शक्य होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘सरप्राईज’ ऑफर आणली होती. एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना ३० जीबी ४जी डेटा सरप्राईज गिफ्ट म्हणून दिला होता. हा डेटा दर महिन्याला १० जीबी या प्रमाणात ३ महिन्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला. रिलायन्स जिओ आणि त्यांच्या प्राईम ऑफर्सला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ग्राहकांना सरप्राईज गिफ्ट दिले होते. माय एअरटेल अॅपच्या माध्यमातून पोस्टपेड ग्राहकांना हा डेटा मोफत देण्यात आला होता. या ऑफरमुळे ग्राहकांना ४ जीच्या वेगाने दर महिन्याला १० जीबी डेटाचा लाभ घेता येत आहेत.