उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षातील अंतर्गत धुसफूसीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अखिलेश यादव विरुद्ध काका शिवपाल यादव यांच्यातील लढाईला नेटीझन्सनी ‘डब्लू डब्लू इ’ च्या खेळाचा रंग दिला आहे. राजकीय वादातून दोन्ही गटामधील कार्यकर्ते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असताना नेटीझन्सनी या धुसफूसीला खेळाचा रंग देऊन मजेशीर प्रतिक्रीया देण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ‘डब्लू डब्लू इ’ मधील लोकप्रिय पहेलवान खली याच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोनंतर ट्विटरकर काका शिवपाल यादव यांना पुतणे अखिलेश यांना शह देण्यासाठी  जॉन सिना मैदानात बोलविण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. शिवपाल ट्विटरकरांचा सल्ला कितपत मनावर घेतील हा भाग वेगळा पण यातुन परदेशात रंगणारा खेळ ट्विटरकरांना उत्तप्रदेशमध्ये पाहण्याची इच्छा झाली आहे म्हणालायला हरकत नाही.

देशात राजकारणाच्या मैदानातून चार हात लांब असणारे लोक ट्विटरच्या माध्यमातून  उत्तरप्रदेशमधील  राजकीय परिस्थितीनंतर एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसते. यासाठी ‘डब्लू डब्लू इ’ या भारताबाहेर चालणाऱ्या खेळाचा आखाडा नेटीझन्सनी उत्तरप्रदेशमध्ये करण्याचा जणू बेतच आखला आहे. आपल्याकडे शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही ‘डब्लू डब्लू इ’ मध्ये झळकणाऱ्या पहेलवानांना लोकप्रियता लाभली आहे. ‘डब्लू डब्लू इ’ मध्ये भारतीयांची शान म्हणून खलीकडे पाहिले जाते. तर आपल्या प्रामाणिक खेळाने जॉन सिनाने देखील लाखो भारतीयांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. जॉन सिना हा आपल्या खास शैलीत प्रतिस्पर्ध्याला आसमान दाखविण्यासाठी प्रसिद्ध आहे.त्याच्या या शैलीमुळे तो परदेशी असून देखील भारतीयांच्या गळ्यातील तो ताईत बनला आहे.

उत्तरप्रदेशमधील दंगलीमध्ये नेटीझन्सना  या दोन पहेलवानांची उत्तरप्रदेशच्या रिंगणात पहाण्याची इच्छा निर्माण झाल्याचे चित्र ट्विटरच्या माध्यमातून दिसते आहे. काही नेटीझन्सनी उत्तरप्रेदशचे मुख्यमंत्री खलीसोबत जवळीक असल्याचे दाखवून काकांना धमकावत असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काहीजण शिवपाल काकांनी जॉन सिन्हाला बोलविण्याचा सल्ला देताना दिसतात. शिवपाल काकांना सल्ला देण्यासाठी जॉन सिन्हासोबत त्यांचे फोटो तयार करुन काहींनी हे फोटो देखील शेअर केले आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यांच्यातील वाद लखनऊमध्ये पोस्टरबाजीतूनही धुसमूसताना दिसत आहे. लखनऊमध्ये एका पोस्टरमध्ये कुत्र्यांच्या डोक्यावर अमरसिंह यांचे छायाचित्र लावण्यात आले असून, त्यांच्याबद्दल अपशब्दही लिहिण्यात आले आहेत. अमरसिंह हे घरामध्ये बेबनाव निर्माण करण्यात कुशल आहेत, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अनिल यादव आणि विनीतकुमार कुशवाहा यांनी सुलतानपूर रस्त्यावर हे पोस्टर लावले आहे. या पोस्टरची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.