प्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण, तो अविघटनशील पदार्थ आहे. पण भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने चक्क पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक बनवले आहे. विशेष म्हणजे हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होणार नाही.

अश्वथ हेगडे हा उद्योजक मुळचा मंगलोरचा पण सध्या कतारमध्ये राहतो. त्याच्या ‘एन्वीग्रीन’ या कंपनीने बायोडिग्रेटेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून त्यांनी या पिशव्या तयार केल्या आहेत. ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या लवकरच भारतात विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा मानस आहे. यावर्षांच्या अखेरपर्यंत या पिशव्या भारतात विक्रीसाठी आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. ३ रुपयांच्या आसपास त्या पिशव्या बाजारात उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.

वाचा : दुबईत राहणा-या ‘या’ भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम

या पिशव्या २४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळतील असा दावा हेगडे यांनी केला आहे. या पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्या तरी त्यांना अपाय होणार नाही असेही हेगडेंनी सांगितले आहे. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनत चालली असून पर्यावरणाला त्यामुळे खूप हानी पोहचत आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे, हेगडे यांना भारत प्लास्टिकमुक्त बनवायचा आहे.