ऊन पावसाचा खेळ सुरू झाला म्हणजे कोल्ह्याचे किंवा बेडकाचे लग्न लागले बहुतेक अशी ओळ अनेकांनी आपल्या आजी-आजोबांच्या गोष्टीत ऐकली असेल. पण कोल्हे किंवा बेडुक लग्न कसे करतात असा प्रश्न त्यावेळी तुमच्या बालमनात आला असेलच. कोल्ह्याचे माहित नाही पण सध्या बेडकाच्या लग्नाचा व्हिडिओ हा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आसाममधल्या काही भागात वरूण देवतेला प्रसन्न करण्यासाठी बेडकाचे लग्न लावण्याची प्रथा आहे. हा व्हिडिओ आसाममधल्या रोंगडोई गावातला आहे. या गावातली बच्चेकंपनीपासून ते आबालवुद्धापर्यंत सगळेच बेडकाचे लग्न पाहण्यासाठी हजर झाले आहेत. येथल्या स्थानिकांनी जंगलातून पकडून आणलेल्या बेडकांचे वैदिक पद्धतीने लग्न लावून दिले तर वरूण देवाची कृपा होऊन पाऊस पडतो अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या गावात माणसांचे लावतात तसेच सगळ्या विधी करून बेडकाचे लग्न लावून दिले जाते. भारतातल्या अनेक भागात जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली, मात्र पूर्वेकडील राज्यात मान्सून पोहचायला उशीर झाला. आसाममध्ये काही महिन्यांपासून दुष्काळ पडला आहे. उशीरा का होईना पण पाऊस आल्याने अनेक शेतक-यांनी पेरण्या केल्या मात्र सुरूवातीचे काही आठवडे बसरून पाऊस गायब झाला. त्यामुळे गावाला दृष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी गावक-यांनी वरूण राजाकडे प्रार्थना केली आहे. बेडकाचे लग्न लावून तरी राज्यातला दृष्काळ संपेल आणि पुन्हा भरभराट येईल अशी भाबडी श्रद्धा ठेवून गावातील सगळीच मंडळी आनंदाने या लग्नात सहभागी झाली आहेत.