देशाला १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला सलाम करण्यासाठी देशभरात मोठा उत्साह आहे. १५ ऑगस्ट रोजी शाळेत होणारे ध्वजारोहण सर्वांसाठी फारसे नवीन नाही. पण आसाममधील धुबरी शहरातील एका शाळेत झालेले ध्वजारोहण आज विशेष कौतुकाचे ठरले, त्याचे कारणही तसेच आहे. आसाममध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या तुफानी पावसामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीतही एका शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.

धुबरी शहरातील नसकारा लोअर प्रायमरी स्कूलमध्ये गुडघाभर पाण्यात शाळेतील सहा जणांनी मिळून ध्वजारोहण केले. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांबरोबर आणखी दोन शिक्षक आणि तीन विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. त्यामुळे इतक्या कठिण परिस्थितीतही या शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने देशप्रेम व्यक्त करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पूरस्थितीमुळे आम्ही फार काही करु शकलो नाही मात्र शाळेत ध्वजारोहण झालेच पाहिजे यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. यावेळी आम्ही उपस्थित असलेल्या सर्वांनी ध्वजारोहण करत राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् म्हटले. लहान मुलांना जास्त वेळ पाण्यात थांबावे लागू नये म्हणून आम्ही अतिशय थोडक्यात हा कार्यक्रम आटोपल्याचे ते म्हणाले.