जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा गोमांस खातो म्हणून त्याने ऑलिम्पिकमध्ये ९ सुवर्णपदके जिंकली असा अजब दावा भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी केला होता. असा दावा करून ते  चांगलेच वादाच्या भोव-यात सापडले होते. त्यानंतर एकही भाजप नेता त्यांची पाठराखण करायला आला नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टिका केली. अखेर आपण हे वक्तव्य केलेच नसल्याची सारवासारव त्यांना करायला लागली. त्यामुळे गोमांस या विषयावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे आणि या वादात थोडे उशीरा का होईना पण योगगुरू बाबा रामदेव यांनी उडी मारली आहे. गोमांस नाही तर गाईचे तूप खाऊन ताकद येते असा सल्ला बाबांनी दिला आहे. ‘ख-या विजेत्याची ताकद ही गोमांसाने नाही तर गाईच्या तूपाने येते हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे’ असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमुळे खरे तर त्याने खासदार डॉ. उदित राज यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा निशाणा हा उदित राज यांच्यावर न बसता तो त्यांच्याच अंगाशी आला. या ट्विटनंतर रामदेव बाबांची देखील नेटीझन्सने चांगलीच खिल्ली उडवली. रामदेव बाबांनी केवळ त्यांच्या पतंजली ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी  हे ट्विट केले असल्याची टिका त्यांच्यावर केली जात आहे. तर गाईचे तूप म्हणजे नक्की पतंजलीचे तूप की आणखी कोणत्या ब्रँडचे तूप असा उपहासात्मक सवाल त्यांना विचारला आहे.