उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच राज्यातील कत्तलाखान्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली, त्यामुळे इथल्या मांसविक्रेत्यांवर चहाची टपरी चालवण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे परवानगी असूनही कत्तलखाना बंद करण्याची बळजबरी करण्यात आली आहे तेव्हा उदरनिर्वाहासाठी आता चहाचा गाडा चालवण्याची वेळ इथल्या मांस विक्रेत्यांवर आली आहे.

सत्ता येताच उत्तर प्रदेशातील कत्तलखाने बंद करण्याचे आश्वासन भाजपकडून उत्तर प्रदेशातील जनतेला निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आले आणि त्यानंतर लगेच कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातील २५० कत्तलखान्यांमध्ये दररोज हजारो प्राण्यांची कत्तल केली जाते. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील अनेक कत्तलखाने कागदोपत्री बंद आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या कत्तलाखान्यांमध्ये प्राण्यांची सर्रास कत्तल केली जाते. महापालिका आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा सारा अवैध उद्योग केला जातो असे आरोप होत आहे. त्यामुळे वाराणसीतील १ तर गाजियाबादमधील १५ अवैध कत्तलखाने बंद करण्यात आलेत.

फोटो गॅलरी : कॅमेरा लेन्सच्या माध्यमातून ‘मीटबंदी’वर दृष्टिक्षेप!

उत्तर प्रदेशातील कत्तलकारखान्यांवर कारवाई केली जात असल्याने या क्षेत्रातील उलाढालीवरदेखील परिणाम झाला आहे. कत्तलखान्यांना कुलूप लावण्यात आल्याने मेरठसह अनेक शहरांमधील मांसविक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित पाच हजार लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आता इथल्या तीन मासंविक्रेत्यांनी पोटाची खळगी बुझवण्यासाठी चहाची टपरी उघडली आहे.  मांसविक्रीवर बंदी घातल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्न समोर उभा राहिला आहे. घरचा खर्च हा याच व्यवसायावर अवलंबून होता पण व्यवसायवरच गदा आल्याने चहा विकून उदरनिर्वाह करावा लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एएनआयला दिली आहे.