इंटरनेटही अजब जग आहे. वास्तवापासून शेकडो मैल दूर असलेले लोक वास्तवात कधी-कधी अशा काही चांगल्या गोष्टी करतात की पुन्हा हे जग स्वप्नवतच वाटू लागते. ढाक्यातील महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या नाझेर अल इसलाम अब्दुल करीमच्या बाबतीत असे काही घडले की त्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वासच बसत नाही.

एकदा साफ-सफाई करताना थोडा विसावा म्हणून करीम हे सोन्याच्या दुकानात असलेल्या दागिन्यांकडे बघत उभे होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला. त्याखाली कॅप्शन लिहिले की या माणसाची लायकी फक्त कचऱ्याकडेच पाहायची आहे. अनेक लोकांनी करीम यांची थट्टा करणे सुरू केले.

पंरतु, त्याच वेळी अब्दुल अल काहतानी यांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी या व्यक्तीचा फोटो ट्विट केला आणि हा माणूस शोधून द्या अशी विनंती इंटरनेटला केली. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर या व्यक्तीचा शोध लागला. काहतानी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांचे इन्सानियत नावाचे एक ट्विटर अकाउंट आहे.

त्यांनी या अकाउंटच्या मदतीने करीम यांना मदत करण्याचे आवाहन केले. करीम यांना हव्या त्या वस्तू मिळण्यासाठी त्यांनी क्राउड फंडिंगने पैसे जमा करण्यास सुरुवात केली. आणि मग पुढे काय? बघता बघता त्यांच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव झाला.

ज्या सोन्यांच्या दागिन्यांकडे ते बघत उभे होते ते दागिनेसुद्धा त्यांना भेट म्हणून मिळाले. इतकेच नव्हे तर त्यांना सॅमसंग, अॅपलचे स्मार्टफोनदेखील मिळाले.

कुणी आपला फोटो काढला याची आपणास कल्पनादेखील नव्हती अशी कबुली करीम यांनी दिली. या सर्व भेटवस्तुंमुळे ते अतिशय खुश आहेत. आपण या सर्व प्रेमाबद्दल कृतज्ञ आहोत अशी भावना त्यांनी एका इंग्रजी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना व्यक्त केली.