छत्तीसगढमधल्या कोरिया गावात अस्वलाच्या दहशतीमुळे गावक-यांपासूनच वनाधिका-यांपर्यंत सगळ्यांमध्येच भीतीचे वातावरण आहे. या अस्वलाने दोघांना ठार केले आहे तर पोलिसांवर देखील हल्ला केला आहे. या अस्वलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तीन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण गावच या अस्वलाच्या दहशतीखाली आहे.  हे अस्वल एका पुरूष आणि महिलेची शिकार करून त्यांना जंगलात ओढून नेत होते,  अंगावर काटा आणणारा  हा प्रकार पाहून दोघांच्या मदतीसाठी काही जण धावले पण अस्वलाने त्यांच्यावर देखील हल्ला केला. या नरभक्षक अस्वलाच्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वनाधिकारी घटनास्थळी धावून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अस्वलाकडून माणसांवर झालेला हल्ला लक्षात घेता पोलिसांनी त्याला पकडण्याचे आदेश दिले आहेत. तर पकडल्यानंतर त्याला ठार करण्यात येईल अशी माहितीही पोलिसांनी दिली. त्याला ठार करण्यासाठी बिलासपूरमधून टीम बोलावली आहे. आतापर्यंत अशा अनेक घटना या भागात घडल्या आहेत. या घटनेमुळे हिंस्र प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.