प्रेमाच्या भावनेला कवी मंगेश पाडगावकरांनी सुंदर शब्दात व्यक्त केलंय.

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,

तुमचं आणि आमचं सेम असतं’

तर कुसुमाग्रजांनी ही निरंतर सुंदर भावना या ओळीमध्ये शब्दबध्द केलीये.

‘प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवूनसुध्दा मेघापर्यंत पोचलेलं’

प्रेमाची भावना सगळ्यांच्या मनात सारखीच. व्यक्त करण्याच्या तऱ्हा निराळ्या पण आतली तीव्रता तीच. कोणी प्रेमात भरभरून देतं तर कोणाच्या प्रेमाचा आविष्कार संयत असतो. पण धुगधुगी तीच. मग हे प्रेम कसं व्यक्त होतं  ते तर व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून आहे.

प्रेमाची ही सर्वव्यापी भावना खऱ्या अर्थाने प्रतीत होते ती प्राण्यांमध्ये. एरव्ही आपल्या सावजासाठी कर्दनकाळ ठरणारा सिंहिणीचा जबडा तिच्या पिल्लांना उचलताना मात्र एक अलगद आधार होतो. जमिनीवरच्या उंदराला एका पकडीत आकाशात खेचून नेणारा गरूड आपल्या पिल्लांना खाणं भरवताना त्याचे धारदार पंजे त्यांना लागणार नाहीत याची काळजी घेतो. कळपातल्या एका छोट्या पिलाच्या रक्षणासाठी हत्तींचा सगळा समूह उभा ठाकतो. अगदी नावावरूनच हिंस्त्र वाटणारे रानटी कुत्रेसुध्दा त्यांच्या कळपातला एखादा कुत्रा दुखापतग्रस्त असेल तर त्याच्यासाठी आपल्या अख्ख्या कळपाचा वेग कमी करतात.

एकाच जातीच्या प्राण्यांमध्ये असणारं प्रेम तर स्पष्ट होतंच. पण कधीकधी दोन अतिशय वेगळ्या प्राण्यांमध्येही एक भावबंध तयार होतो. मग त्यावेळी एकमेकांचे शत्रू मानले जाणारे कुत्रा आणि मांजरसुध्दा एकमेकांसाठी जीव लावतात. ॉ

याच विषयावरचा एकत नितांतसुंदर व्हिडिओ सध्या नेटवर पडलाय. ही ‘अँड्राॅईड’ची जाहिरात आहे. पण प्राण्यांमधली प्रेमाची निरागस भावना दाखवणारा हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडतोय. पाहा हा व्हिडिओ.

सौजन्य- यूट्यूब

असं काही पाहिलं की एरव्ही बोअरिंग वाटणारी ‘प्रेम सर्वव्यापी असतं’ या वाक्यांमधल्या दडलेल्या अर्थानची खरी प्रचीती येते.

[jwplayer qVB2N5Mf]