काही दिवसांपूर्वी लखनऊमधल्या कर्मापूर गावात लग्नात रसगुल्ला दिला नाही, म्हणून एवढं महाभारत झालं की शेवटी लग्नमंडपात आलेली वरात लग्न मोडून माघारी परतली. आता उत्तर प्रदेशमधल्या गावात असाच प्रकार घडलाय. लग्नात मटण बिर्याणी, कबाब अशी दावत वधू पक्षाने दिली नाही, तेव्हा राग आलेल्या नवरदेवाने लग्न मोडण्याचीच धमकी दिली. आता क्षुल्लक कारणावरून नवरा तमाशा करतोय म्हटल्यावर वधू तरी गप्प कशी बसेल. त्यानंतर हे प्रकरण गावच्या पंचायतीकडे गेलं. पण कहाणीत बॉलिवूडच्या चित्रपटात येतो, तसा काहीसा ट्विस्ट आला आणि गोष्टीचा ‘हॅप्पी एंडिंग’ झाला.

उत्तर प्रदेशमधल्या कुल्हेडी गावात केवळ पंगतीत मटणाचे जेवण नसल्याच्या रागातून नवरदेवाने विवाह मोडण्याची धमकी दिली. जेवणाच्या पंगतीत फक्त शाकाहारी जेवण होते. तेव्हा कबाब, बिर्याणी जेवणात का नाही, असं विचारत नवऱ्याने वरात परत नेण्याची धमकी दिली. सध्या उत्तर प्रदेशमध्ये अनधिकृत कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. त्यातून मांस उपलब्धच होत नव्हते. हे वारंवार सांगूनही नवरदेव समजून घ्यायला तयार नव्हता. शेवटी हे प्रकरण पंचायतीकडे गेले. पण एका क्षुल्लक कारणावरून लग्न मोडण्याची धमकी नवरा देत आहे हे पाहून वधूनेही लग्न करण्यास नकार दिला.

शेवटी लग्नाला आलेल्या एका व्यक्तीने या वधूशी विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली. वधू या लग्नाला तयार झाली. पंचायत आणि कुटुंबियांच्या आशिर्वादाने हा विवाह पार पडला. कुर्मापूर गावात गेल्याच आठवड्यात लग्नात असाच एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. वऱ्हाडी मंडळी वाजत-गाजत आली होती. त्याचदरम्यान नवरदेवाचा भाऊ आणि नववधूच्या पाहुण्यांमध्ये रसगुल्ल्यावरून वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की, हातातल्या प्लेट्सही एकमेकांकडे फेकून मारण्यात आल्या. नवऱ्या मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले. अखेर हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.