बंगळुरू शहरातील एका हॉस्टेलमध्ये मुलींच्या अंतर्वस्त्राची चोरी करणाऱ्या एका माणसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक युवक महिलांच्या वसतिगृहात जाऊन बाहेर वाळत टाकलेल्या अंतर्वस्त्रांची चोरी करताना दिसत आहे. हॉस्टेलच्या गच्चीवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही दृश्यं कैद झाली आहेत. यामध्ये एक युवक दबक्या पावलांनी गच्चीवर इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या युवकाने महिलांचीच अंतर्वस्त्रे घातली असून तो दोरीवर वाळत टाकलेली इतर अंतर्वस्त्रे चोरताना दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार बंगळुरूच्या महाराणी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हॉस्टेल प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंतर्वस्त्रांची चोरी करणारा तरूण मनोरूग्ण असण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हॉस्टेलची भिंत ओलांडून हा तरूण आतमध्ये आला. आम्ही पोलिसांकडे त्याची तक्रार दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या आर. शांताकुमारी यांनी दिली. या चोराने हॉस्टेलमधील तब्बल डझनभर अंतर्वस्त्रे चोरल्याची माहिती एका विद्यार्थीनीने दिली.