नवऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या असतानाही तो तुरूंगाच्या बाहेर येतो. पोलीस त्याच्या हातातल्या बेड्या काढतात. त्याची होणारी बायको तुरुंगाच्या बाहेर त्याची वाट पाहत उभी असते. त्या दोघांचं लग्न होतं. आणि त्यांचं लग्न झाल्यावर पुन्हा त्या दोघांची ताटातूट होते. त्याच्या हाताला बेड्या पडतात आणि तो आपल्या बायकोला निरोप देत खिन्नपणे तुरूंगात परत जातो.

ही कोणत्याही मेलोड्रामॅटिक हिंदी सिनेमाची कथा नाही तर असं खरोखर घडलंय. या घटनेबद्दल वाचाल तर डोकंच चक्रावून जाईल. या (खऱ्याखुऱ्या) कथेचा नायक आहे तो २८ वर्षांचा रितेश कुमार आणि २३ वर्षांची सुदीप्ती कुमारी. या दोघांचं प्रेम ‘इंटरनेट’वर फुललं. तुरुंगातून थोड्या वेळासाठी बाहेर पडल्यावर त्यांचं लग्नही झालं. पण पुन्हा रितेशची तुरुंगात रवानगी करण्यात आली आणि त्यांची ताटातूट झाली.

या दोघांची २०१२ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. पेशाने इंजिनीअर असलेला रितेश कुमार त्यावेळी बिहारमध्ये पोस्टिंगला होता. सुदीप्ती बिहारमधल्या धनबादमध्ये राहणारी होती.

फेसबुकवर झालेल्या गप्पांमुळे आपले स्वभाव मिळतेजुळते असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी एकमेकांना भेटण्याचं नक्की केलं. रितेश अनेकदा धनबादला येत असे. त्यावेळी या दोघांच्या भेटीगाठी झाल्यावर त्याचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांनी मंदिरात लग्नही केलं पण त्यानंतर अधिकृतपणे लग्न करण्याची मागणी सुदीप्तीने केल्यानंतर त्याला रितेशने नकार दिला.

आतापर्यंत सुरळीत असलेल्या त्यांच्या प्रेमकथेने आता गंभीर वळण घेतलं. लग्नाला नकार दिल्याने सुदीप्तीने रितेशविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली. सुदीप्ती कुमारी ही दलित असल्याने पोलिसांनी लगेच अॅक्शन घेत रितेश कुमारला अटक केली आणि तुरूंगात टाकलं. पण यानंतरही सुदीप्ती कुमारी रितेशला तुरूंगात भेटत होती. तिला रितेशविषयी वाटणारी घृणा कमी झाली आणि एक दिवस रितेशने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. तिनेही त्याला होकार दिला आणि तुरुंगातच त्यांचा विवाह पार पडला. पण लग्नानंतर या जोडप्याला एकत्र राहता आलं नाही. याचं कारण म्हणजे रितेशवरचा खटला अजूनही चालू आहे आणि त्याला जामीन मिळालेला नाही.