संसद म्हटले की देशातील महत्त्वाचे विषय, त्यावरील गाजणाऱ्या चर्चा आणि वादविवादानंतर अखेर घेतला जाणारा निर्णय असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. मागील काही वर्षांपासून महिलांसाठी संसदेत ठराविक जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार महिला आपले स्थान बळकट करत असताना त्या कितीही पुढे गेल्या, आपल्या क्षेत्रात नाव कमावले तरीही काही गोष्टी मात्र त्यांना टळलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काहीसे धाडसी पाऊल उचलत महिला आपली भूमिका अतिशय चोखपणे निभावत असल्याचे दिसते.

याचा प्रत्यय नुकताच आला असून कॅनबेरा येथील संसदेत आपल्या बाळाला स्तनपान देत लॅरीसा वॉटर्स यांनी आणखी एक इतिहास रचला आहे. मागील महिन्यातही अशाप्रकारचे कृत्य करत नुकतेच त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अशाप्रकारचे धाडस करणारी ही देशातील पहिली महिला ठरली होती. संसदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा होत असते. अनेक महत्त्वाचे निर्णय याठिकाणी घेतले जातात. यावेळी आपण हजर असणे गरजेचे आहे, मात्र आपल्या बाळाकडेही दुर्लक्ष व्हायला नको या हेतून त्यांनी न लाजता ही गोष्ट केली.

आपल्या १४ आठवड्यांच्या अलिया जॉय नावाच्या आपल्या बाळाला लॅरीसाने केलेले स्तनपान या संसदेत आणि देशात अतिशय सामान्यपणे घेतले गेले आहे. ब्लॅक लंग डिसिज या आजाराबाबत लोकसभेत ठराव मंजूर करताना त्यांनी आपल्या बाळाला स्तनपान दिले. स्तनपान न केल्यास होणाऱ्या या आजाराचे महत्त्व सांगत त्यांनी प्रत्यक्ष कृती करुन दाखवली आहे. अशाप्रकारे स्तनपान केल्यानंतर त्यांनी आपल्या बाळाला सर्वांसमोर कीसही केले.

बाळ फेडरल संसदेत स्तनपान घेणारे पहिले बाळ ठरल्याने मला त्याचा अभिमान आहे असे लॅरीस यांनी यावेळी सांगितले. संसदेत जास्तीत जास्त महिला आणि पालक असावेत तसेच याठिकाणचे वातावरणही लवचिक आणि फॅमिली फ्रेंडली असावे असे मत त्यांनी व्यक्त केले. याआधी अशाप्रकारे बाळांना संसदेत आणण्याची परवानगी नव्हती. मात्र आता ती देण्यात आल्याने महिलांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी हे अतिशय सोयीचे झाले असल्याचेही त्या म्हणाल्या.