कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या तरूण नेत्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा आहे. अनेकदा आपल्या कृतीतून ते अनेकांची मने जिंकत असतात. मग जगाने पाठ फिरवलेल्या निर्वासितांना आसरा देणं असो, भारताला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देणं असो किंवा तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणं असो जस्टिन आपल्या ‘कूल’ अंदाजामुळे सगळ्यांचे आवडते झाले आहे. नुकतेच ते टोरेंटोमधल्या एका मंदिराच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी ते चक्क पारंपारिक भारतीय पेहरावात तिथे पोहोचले होते. यावेळी जस्टीन यांनी भगवान स्वामीनारायणाचे दर्शन घेत पूजाही केली. पूजेच्या सर्व विधींमध्ये जस्टिन सहभागी झाले होते. मोरपंखी रंगाचा कुर्ता, गळ्यात फुलांची माळ घालून आलेल्या जस्टिन यांनी सर्व भारतीयांची मनं जिंकली. “हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे’ असे उद्गागार त्यांनी काढले.

जस्टीन यांनी यापूर्वीही भारतीय वेश परिधान केला होता. साधारण वर्षभरापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ते पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घालून आपल्या काही पंजाबी सहकाऱ्यांसोबत भांगडा करताना दिसले होते.