आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही मग आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी चालेल. एकमेकांच्या सुख आणि दु:खात नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे. आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रत्येक जोडप्याने एकमेकांना दिलेले वचन आणि या वचनाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहायचे… सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो हेच सांगतो. चालण्यास असमर्थ असलेल्या आपल्या पत्नीला व्हिलचेअरवर नाही तर चक्क खांद्यावर बसून फिरवणा-या एका वृद्ध पतीचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. सुखी आणि यशस्वी संसारी आयुष्याचा हाच तर मंत्र आहे असेच जणू हे छायाचित्र सांगत आहे.

पिपल्स डेली चायना या चीनमधल्या प्रसिद्ध वृत्तसमूहाने सोशल मीडियावर हा फोटो टाकला आणि काही मिनिटांत या छायाचित्राची चर्चा होऊ लागली. या छायाचित्रात असणारे जोडपे कोण हे मात्र समजू शकले नाही. पण पाय दु:खत असल्याने चालण्यास असमर्थ असलेल्या पत्नीला खांद्यावर घेऊन फिरणा-या वृद्ध जोडप्याचे हे छायचित्र मात्र खूप काही सांगून गेले. चीनची राजधानी असलेल्या बिजिंगमधला हा फोटो आहे.