लहानपणी ऐकलेली त्या भित्र्या सशाची गोष्ट तुम्हाला आठवते का? या सशाच्या पाठीवर पान पडतं आणि हा भित्रा ससोबा आभाळ पडलं म्हणून पळत सुटतो, बरं त्याच्यावर विश्वास ठेवत जंगलातले इतर प्राणीही त्यांच्यामागे पळत सुटतात. आता ही गोष्ट मध्येच आठवण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. एका रेल्वे स्टेशनवर ही माणसं नुसती एकमेकांच्या मागे पळत सुटली आहेत. आपण नेमकं का पळतोय, काय झालंय हे कोणालाच माहिती नाही. पण ट्रेन प्लॅटफॉर्मला आल्यावर एका प्रवाशाने घाबरून डब्यातून पळ काढला आणि ते पाहून डब्यातले इतर प्रवासीही त्याच्यामागे पळत सुटले.

तर गोष्टीत वाचलेला हा प्रसंग चीनच्या शेनझेन स्टेशनवर पाहायला मिळाला. एक प्रावसी घाबरुन आरडाओरडा करत पळून गेल्यानं इतरही प्रवाशांनी त्याचं अनुकरण करत पळापळ करायला सुरूवात केली. यामुळे स्टेशनवर मोठा गोंधळ निर्माण झाला. मोठ्या मुश्किलीने स्टेशनवरच्या सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जेव्हा सुरक्षारक्षकांनी प्रवाशांना पळण्याचं कारण विचारलं तेव्हा एकाजवळही याचं उत्तर नव्हतं.

नंतर सुरक्षारक्षकांनी ट्रेनमधले सीसीटीव्ही फुटेज पाहून सर्वात आधी पळत सुटलेल्या त्या प्रवाशाला पकडलं. तेव्हा ट्रेनमध्ये संशयास्पद वस्तू दिसली म्हणून आपण घाबरून पळ काढला अशी कबुली त्यानं पोलिसांना दिली. पण बाकीचे प्रवाशी मात्र कारण माहित नसतानाही त्याच्या मागे धावत होते. तेव्हा या सगळ्यांची गोष्टीतल्या त्या भित्र्या ससा आणि इतर प्राण्यांसारखी गत झाली होती. हा मजेशीर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.