गेल्या दोन दिवसांपासून देशात उष्णतेची लाट आहे. अनेक ठिकाणी तापमान हे ४० अंश सेल्शिअसच्याही पलिकडे पोहोचले आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत आहे. एकीकडे आग ओकणारा सूर्य तर दुसरीकडे घामाच्या धारांनी हैराण झालेले लोक असे चित्र सगळीकडे पाहायाला मिळत आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. पिण्यासाठी साधं पाणीही मिळेनासं झालंय. पाण्याच्या अभावाने माणसांचे हाल होत आहे, जिथे माणसांची ही स्थिती आहे तिथे या मुक्या जनावरांचे हाल काय होत असतील याची कल्पना करा.

त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या मुक्या जनावरांना थोडं का होईना पाणी द्या, नाहीतर त्यांना आपले प्राण गमवावे लागतील अशा विनवण्या प्राणीप्रेमी संघटनेकडून केल्या जातात, पण फार कमी लोक असतात की जे या सूचना मनावर घेतात. हे सर्पमित्र त्यातलेच एक. दक्षिणेकडील एका गावातील हा व्हिडिओ आहे. काही सर्पमित्रांनी गावात शिरलेल्या  सापाला बाहेर काढलं. त्याला बाहेर काढताच क्षणाचाही विलंब न करता पाण्याची बाटली त्याने सापाच्या तोंडासमोर नेली. जर सापाला वेळीच पाणी मिळाले नसते तर कदाचीत उष्माघाताने त्याचाही बळी गेला असता म्हणून जोखीम पत्करून त्याने पाण्याच्या बाटलीतून सापाला पाणी भरवले. अनेकदा हे साप माणसावर हल्ला करतात पण यावेळी मात्र सापाने असे काहीही केले नाही. कदाचित पाणी देऊन वाचवणा-या दूतावर हल्ला करू नये हे या विषारी सापालाही कळलं असेल.