दिल्ली महिलांसाठी सुरक्षित नाही, येथे दरदिवशी घडणाऱ्या घटना ऐकल्या की त्याची प्रचिती येतेच. याचाच ताजं उदाहरण म्हणजे मेघा नावाच्या मुलीने ट्विवटर शेअर केलेला किस्सा होय. दिल्ली मेट्रोमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर देखील महिला किती असुरक्षित आहे हे तिने पुन्हा एकदा दाखवून दिले. दुर्देव म्हणजे तिच्यासोबत अत्याचार होत असतानाही आजूबाजूच्या लोकांनी फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतली. कॉलेजमधून घरी परतत असताना दिल्ली मेट्रोमध्ये एका माणसाने मेघाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या शेजारी येऊन उभं राहणं हे प्रकार इथल्या प्लॅटफॉर्मवर अनेकदा घडत असल्याचे तिने सांगितले, पण या माणसाने मात्र हद्दच गाठली. मेघा आपल्या वडिलांशी बोलत असताना त्या दोघांचं संभाषण ऐकून ती कोणत्या स्टेशनवर उतरणार आहे याची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न त्याने केला. स्टेशन आल्यावर त्याच्यापासून सुटका करून घेत मेघाने पळ काढला.

वाचा : आत्महत्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार हा ‘अँटी सुसाईड फॅन’

पण जिन्याच्या ठिकाणी कोणी नाही हे पाहून या माणसाने तिला कोपऱ्यात खेचून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मेघाने आपल्या बचावासाठी त्याच्या श्रीमुखात हाणली. पण काही केल्या हा माणूस ऐकायला तयार नव्हता. मदतीसाठी मेघाने आरडाओरडाही केला. पण दुर्दैव म्हणजे त्यावेळी सुरक्षारक्षक जागेवर नव्हताच तो दुसऱ्यांशी गप्पा मारण्यात व्यग्र होता. मेघाच्या वडिलांनी लांबून हा प्रकार पाहिला आणि ते आपल्या मुलीच्या मदतीला धावले. त्यांना पाहताच या माणसाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मेघाचे बाबा या माणसाच्या मागेही धावले. त्यांनी या व्यक्तीला पकडण्यासाठी आरडाओरडाही केला पण एकही व्यक्ती मदतीला धावून आली नाही. सगळेच लांबून हा तमाशा बघत बसले.

वाचा : १०,००,००० रुपये परत करण्याची लाखमोलाची कहाणी!

मेघाने हा संपूर्ण किस्सा सोशल मीडियावर शेअर करत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल नाराजी दर्शवली आहे. ‘महिला इथे सुरक्षित नाहीच पण त्यांच्या मदतीसाठीही इथे कोणी येत नाही. तेव्हा लोकांकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नका तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही स्वत: लढा’ असा सल्ला तिने महिलांना दिलाय.