तमाम ढिंच्याक पूजाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे ती म्हणजे अशी ही ढिंच्याक पूजा लवकरच परत येणार आहे. हे ऐकून तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल, तर ज्या लोकांच्या ती ‘डोक्यात’ जाते त्यांचा आणखी संताप झाला असेल पण तुम्ही कितीही ‘मेलोड्रामा’ केला तरी कोणतंही नाटक ढिंच्याक पूजाला परत येण्यापासून रोखू शकणार नाही. तिने काही तासांपूर्वी तिच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट अपडेट केलीय. यावर तिचा नवा व्हिडिओ परत येणार असल्याचं तिने सांगितंलं आहे. तिने ही पोस्ट अपलोड करताच दीड हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केलीय, तर साडेपाचशेहून अधिक लोकांची तिची पोस्ट शेअरही केली आहे.

गेल्याच आठवड्यात ढिंच्याक पूजाच्या यूट्युब चॅनलवरून तिचे व्हिडिओ काढून टाकण्यात आले होते. कथप्पा सिंह याच्या विनंतीवरून हे व्हिडिओ तिच्या यूट्युब चॅनेलवरून हटवले होते. यूट्युबच्या पॉलिसीनुसार जर तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये दिसत असाल तर तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती तुम्ही यूट्युबला करू शकता आणि याच पॉलिसीमुळे तिचे व्हिडिओ चॅनेलवरून हटवण्यात आले किंवा कथप्पाने कॉपीराईट इश्यूमुळे हे व्हिडिओ हटवण्याची मागणी केली असावी. कारण काही असलं तरी तिचे १२ व्हिडिओ हटवले गेले. पण यातून निराश न होता ती कमबॅक करायला तयार झाली आहे.

‘दारू दारू’, ‘सेल्फि मेने लेली आज’ ‘दिलो का शूटर’ ही तिची गाणी तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. ‘दिलो का शूटर’ या गाण्यामुळे तर ती चांगलीच वादातही सापडली होती. हेल्मेट न घालता ती गाडी चालवताना या व्हिडिओत दिसत होती, तेव्हा वाहतुकीचे नियम मोडले म्हणून तिच्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई देखील केली होती.