नुकताच ‘वर्ल्ड म्यूझिक डे’ साजरा करण्यात आला आणि यानिमित्ताने काही फेसबुक पेजतर्फे चक्क ढिंच्याक पूजाच्या ‘सुरेल’ आवाजाला सलामी वगैरे वाहिली होती. गाणं म्हणजे सुरेल, सुमधूर आवाजाचा संगम असा जो काही आपला पूर्वापार चालत आलेला समज आहे, तो आपल्या ‘आवजा’ने ढिंच्याक पूजाने खोडून काढला. गेल्या काही दिवसांपासून आपल्या ‘सुमधूर’ आवाजाने श्रोत्यांचे कान अक्षरश: ‘तृप्त?’ केले. तेव्हा तिला सलामी तर दिलीच पाहिजे नाही का? म्हणूनच तिच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.

वाचा : ‘ढिंच्याक पूजा’ची कमाई तुम्हाला माहितीय ?

काही दिवसांपूर्वी ढिंच्याक पूजाच्या ‘सेल्फी मैने लेनी आज’ या गाण्याने श्रोत्यांना ‘वेड’ लावलं होतं. कानांवर झालेल्या या ‘अनन्वित’ अत्याचारावरून श्रोते बाहेर येत नाहीत तोच पूजाने आणखी एक गाणं लाँच केलंय. ‘दिलो का स्कूटर’ हे तिचं नवं गाणं नुकतंच तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केलंय. बरं लोकांच्या इच्छेखातर खास हे गाणं आणलंय हे सांगायला ती विसरली नाही. तेव्हा तिने बिचारीने मेहनत घेऊन तुमच्यासाठी हे गाणं बनवलं तर ऐकायला काय हरकत आहे, तेव्हा ढिंच्याक पूजाचं हे नवीन लय भारी गाणं ऐकून तर पाहा! हो पण हे तुमच्या स्वत:च्या जबाबदारीवर!