लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीशी जन्मजन्मांतरीची गाठ बांधणार असतो. त्याच्यासोबत आयुष्य काढणार असतो. त्या व्यक्तीसोबत आपला संसार फुलवणार असतो. म्हणूनच लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातला अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो
पण अनेक संसार चांगल्या प्रकारे उभे राहू शकत नाहीत. काही ना काही कारणाने त्यात व्यत्यय येत राहतो. आणि त्यात हिंसा जर होत असेल तर मग सगळ्या गोष्टी फारच वेगळं वळण घेतात.

आपल्याला मारहाण करणाऱ्या नवऱ्याला शिक्षा व्हावी हे तो मार सहन करणाऱ्या प्रत्येक बायकोला वाटतच असतं. सहनशीलता संपल्यावर ती पोलिसांकडे, न्यायालयात दादही मागते. अशा वेळी न्यायालयाने तिच्या नवऱ्याला दोषी ठरवत शिक्षा मात्र दिली नाही की तिचं अवसान गळतं. व्यवस्थेवरचा तिचा विश्वास उडतो.

ही कहाणी कुठल्या गावाखेडयातली नाही तर न्यूयॉर्कमधली आहे. इथल्या भारतीय वंशाचा अभिषेक गत्तानी हा ३८ वर्षांचा माणूस त्याची बायको नेहा रस्तोगीला (३६) प्रचंड मारहाण करायचा. हे तसं सुखवस्तू कुटुंब होतं. सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी करणाऱ्या अभिषेकची बायको नेहा अॅपल कंपनीमध्ये नोकरीला होती. त्यांना लहान बाळही होतं. अभिषेक गत्तानीची ही मारहाण एकदा त्याच्या बायकोने रेकॉर्ड केली आणि पोलिसांकडे दाद मागितली. यावरून अभिषेक गत्तानीला अटक करून त्याच्यावर खटला चालवण्यात आला. कायद्यानुसार त्याला सहा महिने कारावासाची शिक्षा होणार होती. पण त्याच्यापुढे तिथल्या कोर्टाने ‘गुन्हा कबुल केलास तर फक्त एक महिन्याची शिक्षा होईल’ असा अजब प्रस्ताव ठेवला. त्यामुळे अभिषेकने आपला गुन्हा चटकन कबूल केला. त्याला आता फक्त एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा होणार आहे. त्याहीपुढे जात जर अभिषेक काही सक्तीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला तर त्याची तीही शिक्षा माफ होणार आहे.

या सगळ्यात नेहा रस्तोगीला न्याय कुठे मिळाला? तिला मारहाण करणारा नवरा फक्त काही ‘सामाजिक उपक्रमांमध्ये’ नावापुरता भाग घेऊन तिला मारायला पुन्हा घरी हजर होणार आहे.

या सगळ्या प्रकारात नेहा रस्तोगीला खूपच मनस्ताप झालाय. तिच्या आणि तिच्या बाळाच्या चांगल्या भविष्यासाठी तिने अभिषेक गत्तानीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय.