गाडी घेऊन एखाद्या इमारतीत जात असताना योग्य तो अंदाज घेऊनच आत जावे लागते. नाहीतर काही अघटीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिलीची राजधानी असलेल्या सँटियागोमध्ये नुकतीच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आणि काही वेळातच ती व्हायरलही झाली. त्यामुळे तुम्ही जर कार चालवत असाल तर योग्य ती काळजी घ्यायलाच हवी.

एक महिला चालक आपली कार घेऊन एका इमारतीत गेली. इमारतीत खाली जाणारा रस्ता म्हणजे इमारतीचे पार्किंग असल्याचे तिला वाटले. त्यामुळे तीने अतिशय वेगाने आपली कार उजव्या दिशेला वळवली. मात्र हा रस्ता पार्किंगचा नसून इमारतीत प्रवेश करण्यासाठीचे जिने होते. ही कार काही पायऱ्या खाली गेल्यावर तिने ब्रेकही दाबला. त्यामुळे ती आहे त्याठिकाणी थांबली. यावेळी काहीतरी घडले आहे असे कळाल्याने इमारतीचा सुरक्षारक्षक आणि आजूबाजूचे लोक याठिकाणी जमाही झाले. या कारचालक महिलेला यशस्वीपणे गाडीतून बाहेरही काढण्यात आले.

आता इतके झाल्यावर शांतपणे योग्य ती पुढची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र घाबरलेल्या या महिलेने गाडीतून खाली उतरताना हँडब्रेकच लावला नाही. त्यामुळे गाडी थेट आणखी वेगाने खाली गेली आणि समोरच्या भिंतीवर जाऊन आदळली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नसून कारचालक महिलेच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. यामध्ये इमारतीचे आणि गाडीचेही किती नुकसान झाले त समजू शकले नाही.