भटक्या कुत्र्याने गाडीच्या टायरवर लघुशंका केली म्हणून त्याला आपल्या गाडीखाली चिरडून टाकणे, भटक्या कुत्र्यांना आसुरी आनंदापायी मारून टाकणे अशा प्रकारच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या असतील, अनेकदा आमानुषपणाचा कळस गाठणारे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात, काही वेळा रस्त्यात कुत्रा किंवा मांजर आली की तिला सरळ चिरडून पुढे जाणारे अनेक चालक तुम्ही पाहिले असतील, पण कुत्र्याला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातलेला कार रेसर तुम्ही नक्की पाहिला नसेल. तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा.

एका कच्च्या रस्त्यावरून चालक तुफान वेगात आपली रेसिंग कार चालवत होता. त्याला पाहण्यासाठी आजूबाजूला तुफान गर्दी जमली होती. कार चालवत असताना अचानक त्याच्या वाटेत कुत्रा आला. गाडीचा वेग इतका होता की ब्रेक मारणं शक्य नव्हतं आणि गाडी तशीच पुढे गेली असती तर कुत्रा गाडीखाली चिरडला गेला असता. तेव्हा त्याने तसाच वेग पुढे ठेवत गाडी काही फुट उंच हवेत उसळवली. त्यामुळे कुत्रा वाचला आणि तो गाडी पुढे घेऊन निघून गेला. हा व्हिडिओ नेमका कुठला हे कळू शकले नाही, पण चालकाने ज्या कमालीने त्याला वाचवलं त्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर जास्तच व्हायरल होत आहे.