सध्या दिल्लीमध्ये तीन मित्रांची चर्चा आहे. या मित्रांनी पोलिसांना केवळ मजेसाठी वेठीस धरले आहे. पार्टीवरून परतत असताना या तिघांनी मद्यपाशन केले होते आणि केवळ मजेसाठी त्यातल्या एका मुलीने मदतीसाठी आरडा ओरडा केला. पोलिसांना मात्र ही मुलगी खरच अडचणीत असल्याचे वाटले आणि त्यांनी लगेचच इतर पोलिसांना गाडीची माहिती दिली. पण हे तिघेही पकडले गेल्यानंतर मात्र आपण मजेखातर असे ओरडल्याचे कबुल केले. रविवारी उशीरा रात्री हे तिघेही मारूती गाडीतून परतत होते. मात्र या गाडीत असणा-या मुलीने मदतीसाठी आरडा ओरडा करायला सुरुवात केली. तिथे उपस्थित असणा-या पोलीस हवालदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गाडीचा नंबर आणि इतर माहिती दिली. त्यानंतर या परिसरात नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी गाडी पकडल्यानंतर यातल्या तिघांनीही मद्यप्राशन केले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच आपण मस्करी केल्याचेही त्यांनी  कबुल केले. पोलिसांनी पकडलेल्या या मुलांची नावे जोगींदर आणि सोनू असल्याचे समजते आहे. पण नंतर पोलिसांनी या तिघांनाही सोडून दिले. तर दुसरीकडे पोलिस आयुक्तांनी जबाबदार पोलिसांची भूमिका निभावल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल रविंदर, बलराज आणि पोलिस उपनिरिक्षक संजय पंघाल यांना शाबासकी दिली.