जगात असे अनेकजण आहेत ज्यांना काही ना काही धाडसी करण्याची खुमखुमी असते. या साहसाच्या हव्यासापोटी अनेकजण आपला जीव धोक्यात घालताना दृष्टीस पडतात. असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मद्यधुंद तरुण शार्क असलेल्या एका तलावात उडी मारताना या व्हिडिओत पाहायला मिळतो. बहामाची राजधानी नासाऊमधील एका रेस्तराँमधील हा व्हिडिओ आहे. सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी काहीजण येथे आले होते. इन्स्टाग्रामवर आत्तापर्यंत पाच लाखाहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून, २८०० हून अधिक जणांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

व्हिडिओमधील दृश्य : नासाऊ येथील अटलांटिक रेस्तराँ अॅण्ड कॅसिनोमध्ये हा शार्क पूल आहे. याठिकाणी आपल्या मित्रांसोबत आलेला एक तरुण अचानक पूलमध्ये उडी मारतो. पूलमधील एक शार्क त्याच्या दिशेने चाल करून येताच तो तरुण तातडीने पूलच्या बाहेर येतो. शार्क त्या तरुणाचा पाय पकडेल, असे एका क्षणी वाटते. परंतु, तसे काहीही न होता तो सुखरूप पूलच्या बाहेर पडतो. हा तरुण नशेत असल्याचे सांगितले जाते. त्याच्या मित्रांनी या थरारक घटनेचे व्हिडिओ चित्रण केले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ब्रेट आर्चिबल्ड आपल्या दोन मुलांसह क्रुझवर सुटीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. अचानक पाण्यात पडल्याने ब्रेट यांना २९ तास समुद्रातील पाण्यात घालवावे लागले. समुद्रात त्यांच्या आजूबाजूला भयानक शार्क मासे फिरत होते. शार्क आणि जेली फिशनी त्यांच्यावर हल्लादेखील केला. त्याचबरोबर डीहायड्रेशनपासूनदेखील त्यांना स्वत:चा बचाव करावा लागला. त्यांची एका डोळ्याची दृष्टी जाताजाता वाचली. एवढ्या कठीण प्रसंगातदेखील त्यांनी हार मानली नाही आणि शेवटी त्यांचा जीव वाचला. या भयानक २९ तासांविषयी त्यांनी आपल्या डायरीतही लिहिले आहे. ते २९ तास कुटुंबियांच्या आठवणीत कसे तरी घालविल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.