येणाऱ्या काळात रोबोट आपल्या जीवनातला अविभाज्य भाग बनला तर आश्चर्य वाटायला नको. आता हेच बघा ना चीनने गेल्यावर्षी ‘सिया’ हा रोबोटची निर्मिती केली. हा रोबोट अगदी हुबेहुबे माणसांसारखा दिसत होतो. एका तरुणीला देखील लाजवेल इतक्या सुंदररित्या या रोबोटची निर्मिती केली होती. जगभरात अशा वेगवेगळ्या कामासाठी रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. अगदी घरकामापासून ते फॅक्टरीमधल्या कामापर्यंत प्रत्येक गोष्टींसाठी रोबोटची निर्मिती केली जात आहे. ही काम तर दूरच राहिली पण दुबईने चक्क पोलीस खात्यात रोबोटची भरती केली आहे. दुबईमध्ये गल्फ सुरक्षा एक्स्पोमध्ये पहिल्यांदा या रोबोटला जगासमोर आणण्यात आले. तेव्हा पोलीस दलात रोबोटला भरती करणारा दुबई पहिला देश ठरला.

हा रोबोट दुबई पोलिसांसाठी काम करणार आहे. २०३० पर्यंत रोबोट फोर्स तयार करण्याचा दुबईचा मानस असणार आह. हे प्रत्यक्षात झालंच तर रोबोट फोर्स असणारा दुबई हा पहिला देश ठरेल. दुबई पोलिसात भरती झालेल्या या रोबोकॉपची उंची ५ फूट ५ इंच आहे. तर वजन १०० किलोच्या आसपास आहे. तो सहा वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो. या रोबोटमध्ये अनेक बदल करण्याची गरज आहे, लोकांच्या समस्या समजून घेण्याएवढं ज्ञान या रोबोटमध्ये नाही तेव्हा यावर अधिक संशोधन होणार आहे. तूर्तास तरी मॉल किंवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मदत करणं, शहर सुरक्षित ठेवणं हे या रोबोटचं प्रमुख काम असणार आहे.