गेल्यावर्षी नाडिया नावाच्या डच महिलेची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिच्या २ वर्षांच्या मुलीला घेऊन नवरा भारतात पळाला होता. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेल्या नव-याचा नाडियाने वर्षभरात शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिला काही यश आले नाही, आपल्या मुलीला किमान एकदा पाहायला मिळावे अशा विनवण्याही तिने वारंवार केल्या पण या बापाला काही पाझर फुटला नाही. अखेर या प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लक्ष घालावे यासाठी या महिलेने विनवणी केली आहे.

अॅम्स्टरडॅम येथे राहणा-या नाडिया रशीद हिचा विवाह शहझाद हिमानी याच्याशी झाला होता. पण त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत होते. त्यातून शहझाद नाडियाला मारहाण देखील करायचा. हे संपूर्ण प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले होते. या दोघांनाही दोन वर्षांची मुलगी होती. घटस्फोटानंतर दोन वर्षांची मुलीचा म्हणजे इन्सियाचा ताबा नाडियाकडे गेला. त्यामुळे आपल्या मुलीला मिळण्यासाठी शहझादने साम दाम दंड भेद अशा अनेक मार्गांचा वापर केला. मुलीचा ताबा मिळवण्यासाठी त्याने अनेकदा नाडियाला धमक्याही दिल्या, त्यामुळे आपल्या मुलीला नाडियाने सुरक्षित आपल्या आईकडे ठेवले होते. एकेदिवशी नाडिया घरी नाही हे पाहून काही गुंडांच्या मदतीने त्याने मुलीला पळवले आणि थेट मुंबई गाठली. सप्टेंबर २०१६ ची ही घटना. त्यानंतर ‘ह्युमन्स ऑफ अॅम्स्टरडॅम’ने या आईची दु:खद काहाणी जगासमोर मांडली होती. छोट्या इन्सियाला मिळवण्यासाठी हरप्रकारे नाडियाने प्रयत्न केले, पण वर्षभरात तिला यश आले नाही. शेवटी इथले सामाजिक कार्यकर्ते आणि नाडियाने मिळून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणात लक्ष घालावे यासाठी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत २४ तासांत १८ हजार लोकांनी यावर सही केली आहे.

नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावून येणा-या सुषमा स्वराज आपल्याला मदत करतील आणि आपली दोन वर्षांची मुलगी परत मिळेल अशी नाडियाला आशा आहे.