पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हाईट हाऊस भेट दिवसभरात चर्चेचा विषय ठरली होती, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर मोदींचं खास भारतीय पद्धतीने तेही ‘मोदी स्टाईल’ने नेदरलँडमध्ये स्वागत करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडचे राष्ट्राध्यक्ष मार्क रूट यांनी चक्क हिंदीत स्वागत केलंय. यासाठी मार्क यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हिंदी भाषेत ट्विट करत भारतीयांची मनं जिंकली.

‘नेदरलैंड्स में आपका स्वागत है @narendramodi भारत और नेदेरलैंड्स के 70 साल के द्विपक्षीय रिश्तेके साथ मै हमारी बैठक के लिए बहुत उत्सुक हूं’ असं  ट्विट मार्क यांनी हिंदी भाषेत केलं. तेव्हा मोदींनाही मार्क यांची स्वागताची ही स्टाईल खूपच आवडली. अर्थात मोदी  जेव्हा परदेश दौऱ्यावर असतात तेव्हा अनेकदा त्या त्या देशाच्या राष्ट्रीय भाषेत ट्विट करत आभार मानतात. तेव्हा मोदींच्या याच चांगल्या गुणांचं अनुकरण करत त्यांना खूष करण्याचा प्रयत्न मार्क यांनी केलाय. अशा प्रकारे हिंदीत ट्विट करण्याची मार्क यांची ही काही पहिलीच वेळ नाही, २०१५ मध्ये मार्क जेव्हा भारतात आले होते तेव्हा देखील भारताचं कौतुक करताना त्यांनी हिंदीत ट्विट केले होतं.