मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. आता या निर्णयाला एक महिनाही पूर्ण होईल. पण, लोकांचे हाल अद्यापही कमी झाले नाहीत. आपल्याकडे असलेल्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी लावलेल्या बँक आणि एटीएमबाहेरील रांगा अद्यापही कमी होत नाही. नागरिकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत आहेत. अनेक एटीएममध्ये तर पैसेच उपलब्ध नाहीत. देशातील प्रत्येक राज्यात, गावात तिच परिस्थिती आहे. अनेक एटीएमच्या बाहेर तर ‘एटीएम बंद’ अशी पाटीच लावण्यात आली आहे. त्यामुळे मनस्ताप झालेल्या नागरिकांनी रोष व्यक्त करायला सुरूवात केली आहे. अशातच दिल्ली पूर्व येथल्या रहिवाश्यांनी संतापून एटीएमची पूजाच करून त्याची आरती ओवाळली आहे.

Viral : कै. एटीएम, अंत्ययात्रेसाठी मोदींची प्रतीक्षा

नोटाबंदीमुळे पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याने पूर्व दिल्लीतील जगतपूरी भागातील नागरिकांनी एटीएमला हार घालून त्याची पूजा केली आहे. इतकेच नाही तर एटीएमची आरतीही म्हटली आहे. ‘नवभारत टाईम्स’च्या वृत्तानुसार जगतपूरी भागातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक दिवस या एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत त्याला फुले वाहिलीत. काही दिवसांपूर्वी केरळमधल्या कुन्नुर जिल्ह्यातील गावक-यांनी देखील अशाच प्रकारे आपला संताप व्यक्त केला होता. एटीएम मशिनला फूले वाहून त्यांनी या मशीनला मृत घोषीत केले होते. तसेच त्यावर अंत्यसंस्कार देखील करुन निषेध नोंदविण्यात आला आहे. एटीएमवर अंत्यंसंस्कार करण्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सीपीआय महिला संघटना देखील यात सहभागी झाल्या होत्या. इतकेच नाही तर एटीएमम बंद असल्याचे दु:ख व्यक्त करण्यासाठी महिलांनी रडण्याचे नाटक देखील केले होते.