समाजमाध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या खोटय़ा बातम्यांचा खरा ‘पंचनामा

रविवारी दुपारी समाजमाध्यमांमधून फिरलेला एक संदेश मे महिन्याच्या उकाडय़ातही मुंबईकरांना एसीची थंडगार झुळुक देऊन उत्साहित करून गेला. प्रभादेवीत वातानुकूलित बसथांबा सुरू झालाय, असा तो संदेश. संदेशासोबत समर्पक छायाचित्रही होतेच. प्लास्टिकच्या जाडसर पडद्यांनी आच्छादलेल्या एसी बस स्टॉपमध्ये प्रवासीही दिसत होते. चला, हा संदेश क्षणात अवघ्या मुंबईकरांच्या मोबाइलवर जाऊन आदळला. चर्चा सुरू झाली. प्रभादेवीत कुठे? छॅ.. हा फोटो प्रभादेवीचा नाही., कित्ती बरं झालं असतं जर सगळेच थांबे असे असते तर.किमान उन्हाळयात तरी. एसी नसला तरी चालेल आम्हाला, पंखे तर द्या..म्हणजे बसची वाट पाहाणं जरा सोयीस्कर होईल..समाजमाध्यमांवरून असा ऊहापोह सुरू असताना एकाने नाक खुपसलेच. म्हणाला..अहो अफवा आहे ही. तो एसी बस स्टॉप इथला नाहीच्चेय मुळी. दिल्लीतलाय. झालं! मुंबईकरांच्या नशिबी पुन्हा उसासे टाकणं आलं.

Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ
Viral video IndiGo air hostess heartwarming surprise for brother who joined same airline melts hearts
भावाला इंडिगोमध्ये नोकरी मिळाली, एअरहोस्टेस बहिणीने दिले सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

मुंबईत बसथांबे बेस्टचेच. त्यामुळे ‘बेस्ट’चे प्रवक्ते हनुमंत गोफणे यांना विचारणा केली असता, ‘असा कोणताही थांबा अद्याप मुंबईत निर्माण झालेला नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्षात तीनेक दिवसांपूर्वी एका एसी उत्पादक कंपनीने, खासगी जाहिरात कंपनीच्या सहकार्याने दिल्लीच्या लाजपत नगर येथे एसी बस स्टॉप उभारलाय. ते छायाचित्र तिथलेच. याआधी दिल्लीत असे अनेक प्रयोग घडलेत. मध्यंतरी राजधानी दिल्ली प्रदूषणात एक नंबर होती. तेव्हा एका कंपनीने तिथल्या स्टॉपवर हवा शुद्धीकरण यंत्र बसविली होती. दोन वर्षांपूर्वी चेन्नईमध्येही एसी बसथांब्याचा प्रयोग घडलाय. चेन्नईत एसी बसथांबा उभारण्यासाठी सव्वा कोटी खर्च आला होता. तिथल्या यंत्रणेने असे आणखी थांबे उभारण्यासाठी खासगी कंपन्यांना आवाहन करून मदतीचा हात मागितला होता.

असो..समाजमाध्यमांतून फिरलेल्या या फसव्या संदेशामुळे किमान भविष्यात आम्हालाही वातानुकूलित बसथांबे हवेत, अशी मागणी मुंबईकर बेस्टकडे करू शकतील किंवा बेस्ट प्रशासनाच्या डोक्यातही अशी कल्पना येऊ शकेल. तोवर रणरणत्या उन्हात बोडक्या (नंबर दाखवणारी पाटी जोडलेल्या खांबाशिवाय काहीही नाही) थांब्यावर ताटकळत उभे राहाण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नाही. शहरात छप्पर नसलेले असंख्य बस थांबे आहेत. बेस्टने किमान उन्हापावसाचा विचार करून जिथे शक्य आहे तिथे तरी छप्परवाले थांबे उभारले तरी मुंबईकरांचा त्रागा बऱ्याच अंशी कमी होऊ शकेल.                       (प्रतिनिधी)