अमेरिकेचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू स्टीफन करी याने नुकतीच आशिया खंडाची टूर केली. त्याच्या या टूरचे अपडेट तो आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अपडेट करत आहे. मात्र यातील एका गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता अशी काय गोष्ट आहे ज्यामुळे तुमचे लक्ष वेधले जाईल असं तुम्हालाही वाटलं असेलं तर चीनमध्ये गेला असताना त्याने एका बहुमजली टॉवरच्या ३७ व्या मजल्याच्या काचेच्या जमिनीवर ३ पुश-अप्स मारल्या. आता ३ तर पुश अप्स मारल्यात ना मग त्यात काय इतके? असे तुम्हाला वाटले असेल.

साध्या ४ मजल्यांवरुन खाली पाहिले तरी अनेकांना चक्कर येते. मग ३७ मजल्यांवरुन काचेतून काही मिनिटे खाली पाहणे थरारकच आहे ना. या इमारतीचे वैशिष्ट्यं म्हणजे इमारतीच्या मध्यभागी ३७ मजल्यांपर्यंत काच लावण्यात आली आहे, ज्या काचेतून तळमजल्यावरील गार्डन दिसते आहे. अशा ठिकाणी साधे वाकून पाहणे किंवा चालणेही कठिण असताना स्टीफनने त्यावर डोळे उघडे ठेऊन ३ पुश-अप्स मारल्या आहेत.

यातील आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे स्टीफन करी याची पत्नी आयेशा हीनेही एक स्टंट केला आहे. यामध्ये ती या पारदर्शक काचेवरुन चालत गेली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले आहे की हे धैर्य करण्यासाठी मला ५ मिनिटे स्वतःच्या मनाची तयारी करावी लागली. चीन आपल्या पर्यटकांना अशाप्रकारचे थ्रिलिंग अनुभव देण्यामध्ये कायमच अग्रेसर असल्याने याआधीही चीनमध्ये स्टंट केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

एका रशियन मॉडेलनेही नुकतेच अबुधाबीमधील एका उंच इमारतीवर आपले फोटोशूट केले होते. हे फोटोशूट तिच्या जिवावर बेतणारे होते. सोशल मीडियावर हे फोटोशूट भलतेच व्हायरलही झाले होते. मात्र अशाप्रकारचा स्टंट काहीवेळा धोकादायक ठरु शकतो हे लक्षात ठेवायला हवे.