अमेरिकेच्या फ्लोरिडातील एका ड्रग विक्रेत्याचे आपले ड्रग चोरीला गेल्यानंतर अतिशय प्रामाणिकपणे पोलीस यंत्रणेला कळवले. आता कोणतीही गोष्ट हरविल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करणे हे सामान्यच आहे ना? मात्र एखादी बेकायदेशीर गोष्ट करताना तरी थोडा स्मार्टनेस हवा ना. पण या विक्रेत्याने नको तितका प्रामाणिकपणा दाखवला आणि स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

फ्लोरिडातील डेव्हीड ब्लॅकमन या ३२ वर्षांच्या व्यक्तीने आपले ड्रग्ज चोरीला गेल्यानंतर पोलिसात तक्रार केली. यासाठी त्याने ९११ क्रमांकाला फोन करुन आपली कोकेनची बॅग चोरीला गेल्याचे सांगितले. आपल्या कारमध्ये ठेवलेली आपली ही बॅग आणि साधारण ३२०० रुपये चोरीला गेले असल्याचे सांगितले.

गंमत म्हणजे बेकायदेशीर उद्योग करत असताना पोलिसांपुढे अशापद्धतीने कबुली देताना अडचणीत येऊ हे त्याच्या जराही लक्षात आले नाही. डेव्हीडने सांगितल्याप्रमाणे कोकेन ज्याठिकाणहून चोरीला गेले होते त्याठिकाणी पोलीस गेलेही. आणि त्यांनी चोराचा शोध घेण्याच्याएवजी या ड्रगविक्रेत्यालाच ताब्यात घेतले. मात्र ४ हजार डॉलर दंड भरल्यानंतर त्याला सोडण्यात आले.

या सर्व प्रकारावर सोशल मीडियावरुन अतिशय संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आणि एखादा गुन्हेगार स्वतःलाच कसा अडचणीत आणू शकतो असा प्रश्नही उपस्थित केला जात असल्याचे एनडीटीव्हीने आपल्या बातमीत म्हटले आहे.