सरप्राईझ देणं सगळ्यांनाच आवडतं. मग ते आपल्या आईवडीलांना असो, जोडीदाराला असो की आपल्या मित्रमैत्रिणींना असो. आपल्या आवडीच्या व्यक्तीला तिला अपेक्षित नसताना थक्क करून त्याची प्रतिक्रिया पाहणं ही एक वेगळी आणि आपल्यालाही आनंदित करणारी बाब असते. फक्त अचानकपणे दिसलेल्या व्यक्तीला टपली मारणं वेगळं आणि त्याचं लक्ष वेधण्यासाठी त्याच्या डोक्यावर हातोडा मारणं वेगळं.

असाच एक विनोदी वाटावा असा प्रकार घडला आहे तो मुंबईच्या सेंट जाॅर्जेस हाॅस्पिटलमध्ये. आपल्या डाॅक्टर मित्राला सरप्राईझ भेट देताना त्याच्या दुसऱ्याच डाॅक्टर मित्राने त्याला एवढ्या जोरात मिठी मारली की पहिल्या डाॅक्टरसाहेबांची हाडं खरोखरची तुटली.

सेंट जाॅर्जेसमध्ये काम करणारे डाॅ.मधुकर गायकवाड आणि अहमदनगरमध्ये खासगी प्रॅक्टिस करणारे डाॅ अमित बडवे या दोघांनी औरंगाबादमध्ये एकत्र वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं. नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या या दोघा मित्रांची ही ‘भेट’ सेंट जाॅर्जेस मध्येच झाली.

मुंबईत आलेल्या डाॅ बडवे यांनी गायकवाड डाॅक्टरांना एवढ्या जोरात मिठी मारली की त्यांच्या तीन बरगड्याच तुटल्या!

आता डाॅ गायकवाड अशक्त प्रकृतीचे अजिबात नाहीत. पण काॅलेजदरम्यान बाॅडी बिल्डिंगचा नाद असणारा आपला मित्र थेट जोरदार मिठी मारेल अशा तयारीत ते नव्हते.

“तो माझ्या खोलीत आल्याआल्या मी सुरूवातीला शेकहँडच्या तयारीने उठलो. पण त्याने मिठीच मारली” डाॅ गायकवाड यांनी हसत हसत ‘मुंबई मिरर’ला प्रतिक्रिया दिली. ही मिठी सुटताच डाॅ गायकवाड तोल जाऊन खाली पडले. मिठीदरम्यान आपल्या बरगड्या तुटण्याचा आवाज आपल्याला आल्याचं डाॅ. गायकवाड विनोदाने म्हणाले.

हा मजेशीर प्रकार झाल्यावर हबकलेल्या डाॅ. बडवे आता सेंट जाॅर्जेस हाॅस्पिटलमध्येच अॅडमिट असणाऱ्या गायकवाड डाॅक्टरांना रोज फोन करत त्यांची प्रकृतीची विचारपूस.