कोंबडी जेव्हा अंडी देते तेव्हा ती अंडी तिला २१ दिवस उबवावी लागतात. तेव्हा कुठे त्या अंड्यातून पिलं जन्माला येतात. गावाकडे ज्यांनी कोंबड्या पाळल्या आहेत त्यांच्या हे सहज लक्षात येईल. या काळात ही कोंबडी आपल्या अंड्यांचं आणि त्यातल्या पिल्लांचं अतिशय लक्षपूर्वक रक्षण करते. एरव्ही झाडाचं पान जरी हललं तरी मैलभर पळून जाणारी कोंबडी अंड्यांच्या रक्षणासाठी मात्र कसोशीने प्रयत्न करते. या काळात तुम्ही त्या अंड्य़ांजवळ जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती तुमच्या अंगावर धावून येईल पण अंडी सोडून ती कुठेही जाणार नाही.
फार कठीण असतं हे काम. २१ दिवस सतत त्या अंड्यांवर बसून राहणं, त्यांचं रक्षण करणं काही खाययची गोष्ट नाही.

आता अशाच या कठीण कामाचा अनुभव घेण्यासाठी एका फ्रेंच कलाकाराने कंबर कसली आहे. हा पठ्ठ्या सुमारे डझनभर अंड्यांवर बसून त्यांना खरोखर उबवतोय.

अब्राहम नावाच्या या फ्रेंच कलाकाराने पॅरिसच्या एका प्रसिध्द म्युझियममध्ये तळ ठोकलाय. इथे त्याच्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. काचेच्या या खोलीत अंड्यांच्या या बास्केटवर अब्राहम २४ तास बसून असतो. त्याला दर २४ तासांनी फक्त अर्ध्या तासाचा ब्रेक मिळतो. तो बसलेला आहे त्या खोलीत उष्णता कायम राहावी यासाठी सगळा जामानिमा केला गेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात जास्त उष्णता निर्माण व्हावी यासाठी अब्राहम त्यादृष्टीने आहारही घेतो. या म्युझियममध्ये बसलेल्या अब्राहमला पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे.

हे सगळं करायची गरज तरी आहे का?

पण असले अचाट आणि अतार्किक प्रयोग अब्राहमने याआधीही केले आहेत. याआधी एका दगडामध्ये आठवडाभर बसण्याची कामगिरीही अब्राहमने केली आहे. त्याला बसता यावं म्हणून या दगडामध्ये त्याच्या शरीराच्या आकाराची एक पोकळी कोरण्यात आली होती. त्यामध्ये आठवडाभर बसून त्यानंतर सहीसलामत बाहेर आलेल्या अब्राहमच्या नावाने जगभर चांगलीच चर्चा झाली होती

त्याचा याआधीचा ‘उद्योग’ यशस्वी झाला असला तरी यावेळी त्याच्या पदरी निराशाच येण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण तो जरी ही अंडी उबवत असला तरी त्यातून जिवंत पिल्लं निघण्याची शक्यता कमी आहे असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे.

साधा हिशोब आहे राव. जेव्हा कोंबडी तिची अंडी उबवते तेव्हा त्या अंड्यांचं तापमान १०० अंश फॅरनहीटच्या आसपास असतं. ‘शंभर ताप आहे’ असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मानवी शरीराचं तापमान १०० अंश फॅरनहीट असतं. आता २१ दिवस शंभरचा ताप त्या माणसाला असला तर तो माणूस या जगात राहील तरी का?

पण कलंदर कलाकार अब्राहमला हे कोण सांगणार? विचित्र जग आहे भाऊ!