आपल्यावर शस्त्रक्रिया होणार या भीतीने अनेकांचे हातपाय गळतात. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही  शस्त्रक्रियेबद्दल आपल्या मनात एक स्वाभाविक भीती असतेच. मग डॉक्टरांकडून रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची मानसिक तयारी करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात. या शस्त्रक्रियेदरम्यान एक लहानशी चूक झाली तरीही ती रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. मात्र, चेन्नईत नुकतीच एका मुलीवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. दहा वर्षांच्या या मुलीवर चेन्नईतील रुग्णालयात ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी ही मुलगी आपल्या काकांच्या मोबाईलवर तिचा आवडता कँडी क्रश हा गेम खेळत होती. पाचवीत शिकणाऱ्या या मुलीला अचानक चक्कर यायला लागल्याने तिच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी तिच्या मेंदूत ट्यूमर असल्याचे लक्षात आले होते. त्यानुसार शस्त्रक्रिया करुन हा ट्यूमर काढण्याचे ठरले होते.

Video : ‘या’ मुलामुळे आनंद महिंद्रा झाले प्रेरित; कोणतेही काम कठीण नसल्याचे ट्विट

ब्रेन टयूमरमध्ये क्रॅनियोटोमी ही पारंपारिक शस्त्रक्रियेची पद्धत वापरली जाते. यामध्ये मानवी कवटीतील हाडाचा एक विशिष्ट भाग काढला जातो. त्यानंतर एका विशिष्ट उपकरणाने टयूमर काढण्यासाठी मेंदूवर शस्त्रक्रिया केली जाते. त्यावेळी रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असतो. या मुलीची टयूमर काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीने शस्त्रक्रिया करायची नव्हती. कारण मेंदूच्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये हा टयूमर होता. चुकून मेंदूतील एखाद्या चुकीच्या नसेला स्पर्श झाला असता तर, मुलीची संपूर्ण डावी बाजू निष्क्रीय झाली असती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला जागे ठेऊनच ही शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया चालू असताना तिला कुठल्याही वेदना जाणवल्या नाहीत.

वीरपत्नीची ‘ती’ पोस्ट हेलावून टाकणारी

मेंदूतील हा टयूमर वाढला तर, मुलीला अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो किंवा प्राणघातक ठरु शकते, असे एसआयएमएस रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. रुपेश कुमार यांनी मुलीच्या पालकांना सांगितले होते. अशाप्रकारे शस्त्रक्रिया करण्यास मुलीचे पालक सुरुवातीला तयार नव्हते. परंतु नंतर ते तयार झाले आणि शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. याआधीही एक मुलगा त्याची मेंदूची शस्त्रक्रिया करत असताना गिटार वाजवत असल्याची घटना घडली होती.